नवरात्रोत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवण्याची चळवळ अधिक गतीमान करणे आवश्यक ! – विभाष उपाध्याय, उपाध्यक्ष, मध्यप्रदेश जनअभियान परिषद

इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

इंदूर (मध्यप्रदेश) – अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एका बाजूने असू शकत नाही. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आडून हिंदु देवता आणि भारतमाता यांचे नग्न चित्र काढणारे हिंदुद्वेष्टे म.फि. हुसेन अन् देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असणारे डॉ. झाकीर नाईक यांसारख्या धर्मद्रोह्यांना प्रतिबंध करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने प्रचंड प्रयत्न केले. आम्हीही महाकाल मंदिरात गोमांस भक्षण करणार्‍यांना प्रवेश करू दिला नाही. आता हिंदूंचा पवित्र नवरात्र महोत्सव येत आहे. त्याला आज धर्मविरोधी मनोरंजनाच्या नावावर षड्यंत्राचे शस्त्र बनवले जात आहे. ते होऊ देऊ नका. नवरात्रीनंतर भ्रूणहत्या वाढतात. हिंदु जनजागृती समिती उत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्न करत आहे.

आता आपल्याला ही चळवळ अधिक गतीमान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मध्यप्रदेश जनअभियान परिषदेचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. विभाष उपाध्याय यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त येथील मध्यभारत हिंदी साहित्य समितीच्या सभागृहामध्ये वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते.

या वेळी श्री. विभाष उपाध्याय यांच्या हस्ते हिंदु जनजागृती समिती प्रकाशित ‘हलाल जिहाद’ या हिंदी भाषिक ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी समितीच्या २० वर्षांतील कार्याची यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली. समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी उपस्थितांना ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ विशद केली. या कार्यक्रमाचा समारोप हिंदु राष्ट्रासाठी प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.

श्री. विभाष उपाध्याय यांनी मांडलेली अन्य सूत्रे . . .

१. आज निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी ना हिंदूंचे, ना त्यांच्या जातीचे प्रतिनिधीत्व करतांना दिसून येत. जे लोकप्रतिनिधी त्यांचे करिअर करण्यासाठी राजकारणात जात असतात, त्यांच्याकडून धर्मरक्षणाची अपेक्षा करता येत नाही.

२. अल्पसंख्यांकांच्या सणांच्या वेळी कोणतीही वाहने थांबवली जात नाहीत; परंतु जेव्हा हिंदू महाकाल मंदिरात दर्शनाला येतात, तेव्हा त्यांना नियम दाखवून दंड घेतला जातो, हा भेदभाव संपला पाहिजे.

श्री. विभाष उपाध्याय पुढे म्हणाले,

‘‘मंदिरांचे संचालन भक्तांकडून झाले पाहिजे आणि मंदिर हे हिंदु चेतनेचे केंद्र बनले पाहिजे. धर्म आणि अधर्म यांचे युद्ध जेवढे प्रत्यक्षात दिसते, तेवढेच ते सूक्ष्म जगतातही लढले जात आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्गदर्शन करत आहेत.’’

या वेळी सप्तर्षि गुरुकुलचे संस्थापक डॉ. देवकरण शर्मा म्हणाले, ‘‘द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आज तारुण्यात पदार्पण करत आहे. ज्याची फलनिष्पत्ती आपल्याला हिंदु राष्ट्राच्या रूपात मिळणार आहे.’’

अन्य : ‘हिंदु महासभे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. जितेंद्रसिंह ठाकूर, ‘मातृभाषा उन्नयन संस्थान’चे अध्यक्ष डॉ. अर्पण जैन आणि धर्मप्रेमी श्री. पवन चौधरी यांनी हिंदु जनजागृती समितीविषयी त्यांना आलेले अनुभव व्यक्त केले.