नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर हिवाळी पिकांच्या लागवडीचा आरंभ करा !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

२.९.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील ‘कृषी विचार’ स्तंभातील लेखामध्ये ‘उन्हाळी पिकांच्या पेरणीचा आरंभ अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करतात’, हे आपण पाहिले होते. त्याचप्रमाणे हिवाळ्यात घेतली जाणारी पिके आणि भाजीपाला यांच्या लागवडीचा आरंभ घटस्थापनेच्या दिवशी केला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ज्याप्रमाणे पुढे लागवड करण्याच्या बियाण्याची उगवण क्षमता पडताळण्यासाठी मातीमध्ये थोडे बियाणे लावून पाहिले जाते, त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशीही बियाण्यांची उगवण क्षमता पडताळण्याची परंपरा आहे. नवरात्रीमध्ये विविध मिश्र धान्यांची रुजवण घालून देवीच्या रूपात त्यांचे आजही पूजन केले जाते. यातील जे धान्य चांगल्या प्रकारे उगवेल, ते पेरणीसाठी अधिक योग्य समजले जाते. ‘या दिवशी लावलेल्या झाडांची वाढ चांगली होते’, अशी भारतीय शेतकर्‍यांची श्रद्धा आहे. अगदी घटस्थापनेच्या दिवशी लागवड करणे शक्य झाली नाही, तर नवरात्रीच्या ९ दिवसांत कधीही लागवड करता येऊ शकते.

१. हिवाळी भाजीपाल्याची उदाहरणे

हिवाळ्याच्या कालावधीत पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या, कंदभाज्या असा पुष्कळ भाजीपाला आपल्याला छतशेतीमध्ये किंवा घराजवळील लागवडीत पिकवणे सहज शक्य आहे.

१ अ. पालेभाज्या : पालक, मेथी, लाल माठ, चवळई, शेपू, मोहरी (सरसो) अशा सर्वच पालेभाज्या या ऋतूमध्ये उत्तम होतात, तसेच या कालावधीत त्यांचे नियमित सेवन करणे आरोग्यासही चांगले असते. यापूर्वीच्या लेखांतून आपण पालेभाज्यांच्या लागवडीविषयी विस्ताराने समजून घेतले आहे. कोणतीही हानीकारक फवारणी न केलेली विषमुक्त पालेभाजी मिळवण्यासाठी प्रत्येकानेच स्वतःच्या घरी तिची लागवड करायला हवी.

१ आ. शेंगवर्गीय भाज्या : विविध प्रकारचे वाल, पावटे, फरसबी, हरभरे, तूर, वाटाणे अशा सर्व शेंगवर्गीय भाज्या हिवाळ्यात लावता येतात. या सर्व शेंगभाज्या ‘द्विदल’ पिके आहेत. नैसर्गिक लागवडीमध्ये झाडांना नत्र (नायट्रोजन) मिळण्यासाठी ही द्विदल आंतरपिके (मुख्य पिकाला साहाय्यक पिके) पुष्कळ महत्त्वाची आहेत. त्यामुळे अन्य एकदल पिकांच्या समवेत यांची लागवड आवर्जून करावी.

१ इ. कंदभाज्या : बीट, मुळा, गाजर, कांदा, बटाटा अशा कंदांची लागवड या दिवसांत करावी. लसूणसुद्धा लावू शकतो. यासाठी एकेक लसूण पाकळी वेगळी करून मातीमध्ये थोड्या थोड्या अंतरावर खोचावी. या कंदांची लागवड मुख्य पिकाच्या मधे मधे करावी. त्यामुळे मुख्य पिकाला दिलेले जीवामृत (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांपासून बनवलेले एक नैसर्गिक मिश्रण) या कंदांनाही मिळते. त्यांना निराळे जीवामृत घालण्याची आवश्यकता रहात नाही.

सौ. राघवी कोनेकर

१ ई. अगोदर लहान रोपे सिद्ध करून लावण्याच्या भाज्या : सर्व प्रकारच्या मिरच्या, वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली (फ्लॉवरसारखी दिसणारी एक प्रकारची विदेशी भाजी), झेंडू या सर्वांची लागवड करण्याआधी लहान रोपे सिद्ध करावी लागतात. काही रोपवाटिकांमध्ये ही सिद्ध केलेली रोपे विक्रीसाठी उपलब्ध असतात. घरी रोपे करायची असतील, तर लहान कागदी कप किंवा लहान कुंड्या यांमध्ये यांचे बी लावावे. साधारण २० ते २५ दिवसांनंतर किंवा रोपाला ४ ते ६ पाने आल्यावर उगवून आलेल्या रोपांतील सशक्त रोपे निवडून कुंडी किंवा वाफा (लागवडीसाठी बनवलेले विटांचे कप्पे) यांमध्ये लावावीत.

१ ई १. झेंडूच्या रोपांचे महत्त्व : झेंडूची रोपे नैसर्गिक शेतीमध्ये पुष्कळ महत्त्वाची भूमिका बजावतात.

अ. लागवडीची शोभा वाढवण्यासह झेंडूची पाने आणि फुले अनेक मित्रकीटक आणि मधमाश्या यांना आकर्षित करतात. ‘एका फुलावरील परागकण दुसर्‍या फुलावर पडणे’ याला ‘परागसिंचन’ म्हणतात. फलधारणा होण्यासाठी परागसिंचन आवश्यक असते. झेंडूच्या फुलांकडे आकर्षित होणार्‍या किटकांमुळे परागसिंचनाचे कार्य होऊन उत्पादन वाढण्यास साहाय्य होते.

आ. काही वेळा वांगी, कोबी अशा भाज्यांच्या मुळांवर लहान गाठी दिसतात. या सूत्रकृमींच्या (Nematodes) गाठी असतात. हे कृमी मुळांतून रस शोषून रोपाला हानी पोचवतात. या कृमींचा नाश करणारे एक औषधी तत्त्व झेंडूच्या मुळांमधून स्रवते आणि सूत्रकृमींचे नियंत्रण करते. त्यामुळे प्रत्येक वाफ्यात किंवा मोठ्या पिशव्यांमध्ये (ग्रो-बॅगमध्ये) अन्य भाजीपाल्याच्या समवेत झेंडू अवश्य लावावा.

२. लागवडीसाठी बीजामृत आणि जीवामृत सिद्ध करा ! 

घटस्थापनेला लागवड करण्याआधी बीजसंस्कार करण्यासाठी बीजामृत, तसेच रोपे लावल्यानंतर मातीवर शिंपडण्यासाठी जीवामृत सिद्ध करण्याचेही पूर्वनियोजन करा. बीजामृत आणि जीवामृत यांविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या संकेतस्थळावर दिली आहे.

३. लागवडीमध्ये देवीचे तत्त्व येण्यासाठी प्रार्थना करा !

घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर घरोघरी लागवड करून सात्त्विक, तसेच विषमुक्त भाजीपाला मिळण्यासाठी आणि लागवडीमध्ये देवीचे तत्त्व येण्यासाठी प्रार्थना करा ! – ‘हे भूमाते, हे धान्यलक्ष्मी, तुझे तत्त्व या लागवडीमध्ये येऊ दे. तूच आम्हाला या सेवेतील सर्व बारकावे शिकवून आपत्काळाला तोंड देण्यासाठी सिद्ध कर !’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१९.९.२०२२)