‘जॉन्सन बेबी पावडर’चा परवाना कायमचा रहित !

  • अन्न आणि औषध प्रशासन विभागाची कारवाई

  • उत्पादनात दोष असल्याचे स्पष्ट

मुंबई – ‘जॅान्सन अँड जॉन्सन प्रा.लि.’ या बहुराष्ट्रीय आस्थापनाने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्यप्रसाधनाचा उत्पादन परवाना कायमचा रहित करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न आणि औषध प्रशासनाने केली आहे. या प्रसाधनांचे नमुने प्रशासनाच्या नाशिक आणि पुणे येथील औषध निरीक्षकांनी गुणवत्ता चाचणीसाठी पाठवले होते. त्यानंतर उत्पादन पद्धतीमध्ये दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘जॅान्सन बेबी पावडर’चा प्रामुख्याने नवजात बालकांसाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. या उत्पादनाच्या वापराने नवजात शिशू आणि लहान मुले यांच्या त्वचेस अपाय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुलुंड उत्पादन कारखान्याचा ‘जॅान्सन बेबी पावडर’ या उत्पादनाचा परवाना कायमस्वरूपी रहित करण्यात आला आहे, असे अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त गौरीशंकर बायले यांनी सांगितले.

मुंबई शासकीय विश्‍लेषक आणि औषध नियंत्रण प्रयोगशाळा यांनी वरील दोन्ही नमुने राष्ट्रीय मानकांनुसार अयोग्य असल्याचा निष्कर्ष नोंदवून अप्रमाणित घोषित केले होते. यानुसार अनुज्ञप्ती रहित का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली होती.