धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी ‘ॲमेझॉन इंडिया’ला नोटीस

नवी देहली – राष्ट्रीय बाल संरक्षण आणि अधिकार आयोगाने ‘ॲमेझॉन इंडिया’ आस्थापनाला नोटीस बजावली आहे. धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी या नोटिसीद्वारे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

१. आयोगाने म्हटले की, अरुणाचल प्रदेशमधील सामाजिक न्याय मंच या संस्थेकडून आयोगाला तक्रार प्राप्त झाली आहे. अमेरिका आणि ब्रिटन येथे नोंदणीकृत ‘ऑल इंडिया मिशन’ या खासगी संस्थेच्या अवैध कृत्यांमध्ये सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संस्था भारतात मुलांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करत आहे. वरील संस्थेचे संपूर्ण भारतात १०० हून अधिक अनाथाश्रम असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संस्थेचे संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमांच्या पानांवर स्पष्टपणे नमूद केले आहे की, त्यांनी भारतात धर्मांतर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि विशेषतः ईशान्य भारत अन् झारखंड राज्यामध्ये अनेक लोकांचे धर्मांतर केले आहे.

२. या संस्थेला ‘ॲमेझॉन इंडिया’कडून निधी मिळतो, असा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे. ‘ॲमेझॉन इंडिया’ने त्यांच्या मंचावर नमूद केले आहे की, त्यांचे ग्राहक ‘ॲमेझॉन स्माईल’वर खरेदी करून ‘ऑल इंडिया मिशन’ला समर्थन देऊ शकतात.

संपादकीय भूमिका

  • ‘ॲमेझॉन’कडून नेहमीच हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी उत्पादने विकल्याचे समोर आले आहे ! आता थेट हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थांना देणगी दिल्याचे समोर आल्याने केंद्रशासनाने ॲमेझॉनवर भारतात व्यापार करण्यावरच बंदी घातली पाहिजे ! यासाठी हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे.
  • हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांना पैसे देणार्‍या ‘ॲमेझॉन’वर धर्माभिमानी हिंदूंनी बहिष्कार घातल्यास आश्चर्य ते काय ?