१. रथोत्सवाच्या चित्रीकरणाची पूर्वसिद्धता करतांना आलेल्या अनुभूती
१ अ. रथोत्सवाचे चित्रीकरण करण्याच्या दृष्टीने ‘स्टोरीबोर्डिंग’ची सेवा करतांना रथोत्सवाचा कार्यक्रम १५ दिवस आधीच अनुभवता येणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त होणार्या रथोत्सवाचे चित्रीकरण करणे आणि त्या दृष्टीने आधी ‘स्टोरीबोर्डिंग’ करणे, या सेवा करण्याची संधी मला मिळाली होती. (‘स्टोरीबोर्डिंग’ याचा अर्थ येथे चित्रीकरणाची पूर्व-दृश्यमानता करण्याच्या उद्देशाने क्रमाने प्रदर्शित केलेली चित्रे (म्हणजेच चित्रीकरण कसे होईल, याची आधी कल्पना करून ते चित्रस्वरूपात रेखाटणे.)) त्यामुळे २२.५.२०२२ या दिवशी होणारा रथोत्सवाचा कार्यक्रम मला १५ दिवस आधीच अनुभवता आला.
१ आ. जेव्हा मी ही सेवा करत होतो, तेव्हा ‘प्रत्यक्षात गुरुदेव रथात आरूढ झाले आहेत’, असे जाणवून माझी भावजागृती होत होती.
१ इ. सरावासाठी नियोजित मार्गावरून रथ चालवून पहातांना जाणवलेली सूत्रे
१ आ १. कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी रथ चालवतांना पाऊस पडल्याने ‘आजच गुरुदेवांच्या रथोत्सवाला आरंभ झाला असून वरुणदेव तो पहात आहे’, असे जाणवणे : ‘गुरुदेवांच्या रथयात्रेसाठी सिद्ध करण्यात आलेला रथ नियोजित मार्गावरून व्यवस्थित जाऊ शकतो ना ? कुठे अडथळा येत नाही ना ?’, हे पहाण्यासाठी रथाचे चालक साधक श्री. परशुराम पाटील यांनी तो रथ मार्गावरून चालवून बघावा’, असे उत्तरदायींनी सांगितले होते. तेव्हा तो अभ्यास करण्यासाठी २०.५.२०२२ या दिवशी पहाटे २ ते ४ या वेळेत आम्ही काही साधक तो रथ नियोजित मार्गावर (म्हणजे रामनाथी आश्रम ते नागेशीपर्यंत) चालवून पाहिला. हे करत असतांना पाऊस पडत होता. तेव्हा जणू काही ‘आजच पहाटे गुरुदेवांचा रथोत्सव चालू आहे आणि वरुणदेव तो पहात आहे’, असे मला जाणवले.
१ आ २. ‘रथयात्रेचा मार्गही गुरुदेवांच्या जन्मोत्सवाची वाट पहात आहे’, असे जाणवणे : रथाच्या उंचीचा अभ्यास करण्यासाठी रथयात्रेच्या मार्गावरून मला बर्याच वेळा ये-जा करावी लागायची. तेव्हा ‘तो मार्गही गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवसाची आतुरतेने वाट पहात आहे’, असे मला जाणवायचे.
२. रथोत्सवाच्या दिवशी छायाचित्रे काढण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती
२ अ. रथोत्सवाच्या दिवशी पूर्वी कधीही अनुभवली नाही, एवढी भावजागृती होणे आणि शेवटी छायाचित्रे योग्य रितीने काढण्यासाठी भावाश्रू थांबवण्याची देवाला प्रार्थना करणे : २२.५.२०२२ या दिवशी म्हणजे प्रत्यक्ष रथोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच माझी भावजागृती होत होती आणि जेव्हा रथ आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येत होता, तेव्हा आजपर्यंत कधीच झाली नाही, एवढी माझी भावजागृती झाली. तेव्हा मी लगेच देवाला क्षमायाचना करून प्रार्थना केली, ‘देवा, मला हा सोहळा पहाण्याची संधी दिलीस. त्यामुळे माझी भावजागृती झाली; परंतु आता हे भावाश्रू थांबव. माझ्याकडे छायाचित्रे काढण्याची सेवा आहे. तेव्हा जर माझ्या डोळ्यांतून पाणी येत राहिले, तर मला योग्य रितीने छायाचित्रे काढणे कठीण होईल. ही छायाचित्रे पाहून अनेक साधकांची भावजागृती होणार आहे, त्यामुळे तूच माझ्याकडून ही सेवा करून घे.’
२ आ. आजपर्यंत मी गुरुदेवांची अनेक छायाचित्रे काढली आहेत; पण रथोत्सवात गुरुदेवांची छायाचित्रे काढतांना माझे मन पूर्णतः भावस्थितीत होते.
२ इ. रथामध्ये बसलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे काढत असतांना मला माझ्या मनात गुरुदेवांचे अस्तित्व सतत जाणवून अंगावर शहारे येत होते.
२ ई. रथोत्सवाची छायाचित्रे काढतांना साधारण २ – २ किलोचे २ छायाचित्रक (कॅमेरे) खांद्यावर असूनही मला हलकेपणा जाणवत होता.
३. देहभान हरपून सेवा करून घेतल्याबद्दल गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
ज्याप्रमाणे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी शेकडो किलोमीटर चालत येतात आणि वारी अंतिम टप्प्यात आल्यावर कळस दृष्टीला पडताच वारकर्यांची गती वाढते. देवाच्या दर्शनासाठी काही जण जलद गतीने, तर काही जण देहभान हरपून धावतच सुटतात, त्याप्रमाणे १ मास आधी चालू झालेली ही सेवा देहभान हरपून गुरुदेवांनीच करून घेतली, यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
ही सेवा करतांना पदोपदी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे सेवा अधिक जोमाने करता आली, यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. केदार नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.६.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |