अमरावती जिल्ह्यातील ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातील तरुणीचा सातारा येथे शोध लागला. पोलिसांनी तिला अमरावतीत आणले. ‘हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण नाही’, असे पोलिसांनी सांगून सामाजिक माध्यमांवरूनही तशी आवई उठवण्यात आली. ‘ती तरुणी स्वतःहून घरातून निघून गेली होती’, असा कांगावा करण्यात आला. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी तर ‘लव्ह जिहाद’च्या नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करणे, हा अपराध नाही का ? मग कारवाई का नाही ?’, असे ट्वीट केले; मात्र राज्यात काँग्रेसची सत्ता असतांनाच ‘लव्ह जिहाद’च्या घातक प्रवृत्तीचा प्रारंभ झाला, हे ते विसरले.
हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण आहे, असे सांगून या प्रकरणावरून तरुणीच्या शोधासाठी पोलिसांशी लढा देणार्या खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकेची झोड उठली. वास्तविक ‘तक्रार करूनही पोलीस तरुणीचा शोध घेत नाहीत’, अशी तक्रार तिच्या वडिलांनी राणा यांच्याकडे केली होती. त्यामुळे राणा यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी अन्वेषण करत तरुणीचा शोध लावला. असे असूनही राणा यांच्या विरोधात पोलीस पत्नी वर्षा भोयर आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून राणा यांच्यावर कारवाईची मागणी केली.
अमरावती जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ची आतापर्यंत ३० हून अधिक प्रकरणे घडली आहेत. यातील १-२ वगळता इतर प्रकरणातील बेपत्ता हिंदु मुली आणि त्यांना पळवून नेणारे धर्मांध मुसलमान यांचा पोलिसांनी शोध लावला नाही. या प्रकरणी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आवाज उठवूनही पोलिसांनी धर्मांध मुसलमानांचा शोध घेतला नाही. आतापर्यंत जनतेचे रक्षक म्हणवणारे पोलीस लाच घेतात अथवा कर्तव्यात अल्प पडतात, हे वेळोवेळी समोर आले आहे. असे असतांना अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणासह ‘लव्ह जिहाद’प्रकरणी अन्वेषणात हलगर्जीपणा करणार्या पोलिसांच्या विरोधात पोलिसांच्या पत्नी आणि निवृत्त पोलीस अधिकारी यांनी कधीतरी मोर्चा काढला आहे का ? किंवा आंदोलन केले आहे का ? अथवा जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र पाठवले आहे का ? पोलिसांनी ‘लव्ह जिहाद’च्या प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यास उद्या त्यांच्या मुलीही त्याला बळी ठरण्याची शक्यता नाकारता येईल का ? ‘लव्ह जिहाद’चा प्रकार समाजातून नष्ट करण्यासाठी पोलीस असंवेदनशील का ? हा प्रश्न त्यामुळे समाजासाठी अनुत्तरितच आहे !
– श्री. सचिन कौलकर, मुंबई