#Datta Datta #दत्त दत्त #श्रीदत्त श्रीदत्त #ShriDatta ShriDatta #mahalaya mahalaya #महालय महालय #pitrupaksha pitrupaksha #पितृपक्ष पितृपक्ष #shraddha shraddha #श्राद्ध श्राद्ध #ShraddhaRituals Shraddha rituals #श्राद्धविधी श्राद्धविधी #Shraddhavidhi Shraddha vidhi
व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.
१. पक्ष
भाद्रपद मासातील कृष्णपक्ष
पितृपक्ष (महालय पक्ष) चलच्चित्रपट
२. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व
पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात.
३. पितृपक्षात श्राद्ध का करावे ?
अ. `पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते; म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.’
– सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, सायं. ६.०२)
आ. पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे.
इ. पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात.
ई. पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते.
– श्रीमती मेघना वाघमारे
४. श्राद्ध करण्याची पद्धत
अ. ‘भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृत्रयी – पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा); मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.
आ. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे.
इ. शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण सांगावेत.
ई. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.’
उ. पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे खाली सारणीत दिली आहेत.
तिथी |
श्राद्धाचे नाव |
कोणासाठी ? |
विधिविशेष |
१. चतुर्थी किंवा पंचमी (भरणी नक्षत्र असतांना) | भरणी | मृत झालेली व्यक्ती (टीप १) | |
२. नवमी | अविधवा नवमी | अहेवपणी मृत झालेली स्त्री | श्राद्ध न करता सवाष्णीला भोजनही घालतात |
३. त्रयोदशी | बाळाभोळानी तेरस (सौराष्ट्रातील नाव) | लहानमुले | काकबळी |
४. चतुर्दशी | घातचतुर्दशी | अपघातात मृत्यू पावलेले, शस्त्राने मारले गेलेले |
टीप १ – पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे. वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते. त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे. काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर १२ व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते.
५. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व
दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ७२ माळा नामजप करावा.
६. पक्षपंधरवडा (पितृपक्ष) सर्व कर्मास निषिद्ध का असतो ?
अ. पक्षपंधरवडा कालावधी
भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो; पण भाद्रपद अमावास्येला (म्हणजेच सर्वपित्री अमावास्या) महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते; म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल.
आ. विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे
पक्षपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात ‘विवाह’ हा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर रहातात. प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्षपंधरवडा आड येत नाही. पक्षपंधरवड्याचा दूरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी पापयोनींशी लावला जातो; पण परिस्थिती अगदी उलट असते. निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणार्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही.
७. भरणी श्राद्ध
अ. पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे
पहिल्या वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतांनाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते, यात शास्त्राज्ञाचे उल्लंघन होते.
आ. भरणी श्राद्ध करण्याचा काल
पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ‘ते प्रतिवर्षी करावे’, अशी शास्त्राज्ञा आहे; पण दुराग्रहाने ते एकदाच करणार्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये.
८. इतरही मघादी श्राद्धे
भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसर्या वर्षापासून करावीत.
९. नित्य तर्पण
नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये.’
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
(सौजन्य : सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संकेत स्थळ sanatan.org)
Sanatan Sanstha presents Shraddha Rituals App !
App is available in – Marathi, Hindi, Kannada, Gujarati, Telugu, Malayalam & English