रुग्णांमध्ये, विशेषतः स्त्री रुग्णांमध्ये विचार करत रहाणे, हे लक्षण सर्वसामान्यतः दिसते. ज्याला आपण ‘ट्रेन ऑफ थॉटस्’ म्हणतो. हे विचार एका पाठोपाठ एक येऊन मनाचा ताबा घेतात आणि काल्पनिक किंवा भूतकाळातील विचारांमध्ये आयुष्याचा बहुमोल वेळ वाया जातो. यामुळे थकवा येऊन निरुत्साह, शारीरिक तक्रारी आणि या विचारांनी येणारी बाकी लक्षणे, तसेच मनःस्वास्थ्य कमी होऊन झोपेवर परिणाम ही लक्षणे दिसतात.
काही उपाययोजना
१. जेव्हा भूतकाळातील एखादी घटना तुमच्या विचारांची साखळी चालू करते, तेव्हा वेळीच पुस्तक वाचन वा अन्य वेगळ्या ठिकाणी मन रमवा.
२. असे विचार थांबण्यास स्व-समुपदेशन पद्धतीचा चांगला लाभ होतो.
३. मनावर काम करणार्या वनस्पती, तूप, स्नेह, नस्य या उपचारांचा तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली उपयोग होतो.
४. त्रासदायक घटना काय होती (ॲक्टिव्हेटिंग ट्रिगर), आपण ती कशी बघतो (बेलिफ) आणि त्याचे आताच्या आयुष्यातील महत्त्व (कॉपिंग) या ‘ए’-‘बी’-‘सी’ सूत्रांवर विश्लेषण करणे. आपण तेच तेच विचार करत राहून अगदी सूक्ष्म पातळीवर दुसर्याची सहानुभूती मिळावी, यादृष्टीने विचार करत नाही ना ?, याचे परीक्षणही करायला हवे.
५. काही काही वेळा आपण पुष्कळ प्रयत्न करूनही यश येत नाही; पण आपल्या कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये काही व्यक्ती अशा असतात ज्यांचे आपण साहाय्य घेतल्यास त्याचा उत्तम लाभ होतो.
६. मनाची शक्ती वा सहनशक्ती न्यून होणे, हे वात प्रकोपाशी निगडित असते. वातावरील विशेष चिकित्सा, ध्यान, पायाला नियमित तेल लावणे, स्निग्ध बस्ती याने मनाची धावण्याची वृत्ती नक्कीच न्यून होते.
७. शरिरातील स्निग्धता न्यून झाली असता मनाचा चंचल गुण नक्कीच वाढतो आणि त्याचा विचार अन् झोप या दोन्हीवर परिणाम होतो, परिणामी शरीर खराब होऊ शकते. यासह अंगात उष्णता अधिक असेल, तर अजून विविध लक्षणे उत्पन्न होतात, सहनशक्ती न्यून होते. त्यावर उपाययोजना केली की, लाभ दिसतो.
वरील तत्त्वे ही मार्गदर्शक असून ती पूर्ण इलाज नाही, तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे आवश्यक !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.