पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सिद्ध करण्यासाठी सर्वंकष विचार घेणार !

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आढावा बैठकीत आश्वासन

सोलापूर, १२ सप्टेंबर (वार्ता.) – श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत पंढरपूर अन् पालखी मार्ग यांवर भाविकांना पायाभूत सुविधा देण्याच्या अनुषंगाने नव्याने समाविष्ट करायच्या कामांचा आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. याविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या सूचना, मते विचारत घेऊन सर्वंकष आराखडा सिद्ध करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

१. जिल्हा नियोजन भवन येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याविषयी आयोजित  आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

२. या वेळी जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, ‘‘मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर आणि मंदिर परिसर यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, रस्ते, वाहनतळ, गर्दी व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करणे आदी गोष्टींचा समावेश असणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत नव्याने समाविष्ट करण्यात येणार्‍या कामाविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक, व्यापारी संघटना, वारकरी यांनी लेखी सूचना एका सप्ताहात द्याव्यात.’’

३. मंदिर परिसर, मंदिर आणि दर्शनबारी याठिकाणी सोयीसुविधा देणे, २८ परिवार देवतांची मंदिरे यांचाही समावेश विकास आराखड्यात करण्यात आला आहे. प्रत्येक ठिकाणी भाविकांना समजण्यासाठी चिन्हे, खुणा, सूचना फलक लावण्यात येणार आहेत.

वाराणसीच्या धर्तीवर घाट आणि महाआरतीचे नियोजन करावे ! – खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी

वाराणसी येथील घाटाप्रमाणे घाट बांधणी करावी. घाट बांधणीसाठी तज्ञ मंडळींचा समावेश करावा, तसेच चंद्रभागा नदीकाठी महाआरतीचे नियोजन करावे, अशा सूचना खासदार महास्वामी यांनी या वेळी केल्या.