उमेश कोल्हे हत्या प्रकरण
अमरावती – शहरातील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणाने (‘एन्.आय.ए.’ने) आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील आणखी १ आरोपी अद्यापही पसार आहे. शमीम अहमद उपाख्य फिरोज अहमद असे या पसार आरोपीचे नाव असून त्याचा शोध लागत नाही. त्यामुळे त्याची माहिती देणार्यांसाठी २ लाख रुपयांचे पारितोषिक ‘एन्.आय.ए.’ने घोषित केले आहे. अन्वेषणाच्या वेळी मौलवी मुश्फिक याचा संबध ‘पी.एफ्.आय.’शी (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या हत्येमागे ‘पी.एफ्.आय.’चा हात असल्याचा संशय ‘एन्.आय.ए.’ला होता. त्या दिशेने ‘एन्.आय.ए.’ने स्वतःचे अन्वेषण चालू केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ इरफान शेख हा मौलवी मुश्फिक अहमद याला आदर्श मानतो. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारी पोस्ट पुढे पाठवल्याने मुश्फिक याच्या सांगण्यावरून अमरावतीच्या कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. एवढेच नाही, तर आरोपींनी हत्येनंतर बिर्याणी मेजवानीही केली होती. या मेजवानीत कोण सहभागी होते ? याचे एन्.आय.ए. अन्वेषण करत आहे.