शंकराचार्यांचा देहत्याग !

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाल्यावर जगभरातून त्याला प्रसिद्धी देण्यात आली. पुढील काही दिवस याविषयीची वृत्ते, लेख, अन्य घडामोडी चालू रहाणार आहेत. हे चालू असतांना हिंदूंचे बद्रीनाथ आणि द्वारका या २ पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबर या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या पार्थिवाला १२ सप्टेंबर या दिवशी भू समाधी देण्यात आली. त्यांच्या देहत्यागाविषयी राष्ट्रपती, पंतप्रधान आदींनी शोक व्यक्त केला आहे. ‘ज्याप्रमाणे भारताने ब्रिटनच्या महाराणीच्या निधनानंतर भारतात एक दिवसाचा दुखवटा पाळला, तसा दुखवटा जगभरातील दीडशे कोटींहून अधिक हिंदूंच्या शंकराचार्यांच्या देहत्यागानंतरही घोषित केला पाहिजे’, असे विचार धर्मप्रेमी हिंदूंच्या मनात आले असतील; मात्र भारत सरकारकडून अद्याप तरी असे काही घोषित करण्यात आलेले नाही आणि ‘तसे काही केले जाईल, अशी अपेक्षा करता येत नाही’, असेही वाटते. याला ‘भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे’, असे काहीतरी कारण दिले जाऊ शकते. अर्थात् महाराणी एलिझाबेथ आणि शंकराचार्य यांची तुलना कधीही होऊ शकत नाही. महाराणीच्या देशाने भारतावर राज्य करून भारतियांना गुलाम बनवले, देशात फुटीरतेची बीजे पेरली, गुरुकुले नष्ट करून धर्मशिक्षण बंद केले, हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. यामुळे झालेल्या हानीचे भयानक परिणाम देश अजूनही भोगत आहे. शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंच्या ४ पैकी २ पीठांचे आणि सर्वांत ज्येष्ठ अन् प्रमुख शंकराचार्य होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेऊन कारावासही भोगला आहे. त्यांना ‘क्रांतीकारी साधू’ असेही म्हटले गेले होते. ‘हे पहाता त्यांना हा सन्मान दिला पाहिजे’, असेही हिंदूंना वाटेल. कोणत्याही पाद्रयाने किंवा एखाद्या इमामाने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला का ? आणि कारावास भोगला होता का ?, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो; मात्र ‘राष्ट्र आणि धर्म यांसाठी हिंदू अन् त्यांचे धर्मगुरुच नेहमी पुढे असतात’, असेच दिसते. ‘शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे काँग्रेसधार्जिणे होते, त्यांचे काँग्रेसी नेत्यांशी अधिक चांगले संबंध होते. दिग्विजय सिंह हे त्यांचे परमभक्त आहेत’, असे सांगितले जाते. त्यामुळे त्यांच्याकडे त्या दृष्टीनेही पाहिले जात असावे; परंतु आज अयोध्येमध्ये जे भव्य श्रीराममंदिर बांधले जात आहे, त्या मंदिरासाठी कधी काळी या शंकराचार्यांनी लढा दिलेला आहे, हे विसरता कामा नये. काँग्रेसच्या काळात गोहत्याबंदीसाठी ज्या धर्मसम्राट श्री करपात्री महाराजांनी देहलीमध्ये आंदोलन केल्याने त्यांना देहत्याग करावा लागला, त्या करपात्री महाराजांचे हे शंकराचार्य शिष्य होते, हे लक्षात घ्यायला हवे. ‘केंद्रातील सरकार हिंदुत्वनिष्ठ आहे’, असे म्हटले जाते, तर त्या दृष्टीने शिष्टाचारानुसार ‘सरकारने शंकराचार्यांविषयी दुखवटा घोषित करणे आवश्यक आहे’, असे धर्मप्रेमींना वाटते. अर्थात् जे हिंदु साधना करणारे आहेत, त्यांच्या लेखी अशा सरकारी दुखवट्याला काही महत्त्व नाही, हेही तितकेच सत्य आहे. ‘कुणाच्या निधनावर, देहत्यागावर शोक करू नये; कारण तो एक देह सोडून दुसरा देह घेणार असतो किंवा पुढच्या गतीला जात असतो’, असे भगवान श्रीकृष्णानेच श्रीमद्भगवद्गीतेमध्ये सांगूनच ठेवलेले आहे.

हिंदूंना साधनेला लावणे आवश्यक !

अन्य पंथियांना त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु कोण, हे माहीत नाही, असे होत नाही; पण भारतातील बहुसंख्य हिंदूंना शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्याविषयी ठाऊक नसणार, ही वस्तूस्थिती आहे. शंकराचार्य म्हणजे कोण ? त्यांचे कार्य, किती शंकराचार्य आहेत ? आणि त्यांची नावे काय ? आदी माहिती अनेक हिंदूंना ठाऊक नाही. याला सध्याची धर्मनिरपेक्ष व्यवस्था आणि हिंदूंना धर्मशिक्षण न मिळणे हेच कारणीभूत आहे. ‘याला काही प्रमाणात हिंदूंचे धर्माचार्यही उत्तरदायी आहेत’, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. भारत धर्मनिरपेक्ष असला, तरी मुसलमानांना त्यांच्या मदरशांमधून धर्मशिक्षण मिळते, ख्रिस्त्यांना चर्चमधून, त्यांच्या कॉन्व्हेंट शाळांमधून धर्मशिक्षण मिळते; मात्र हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याची अशी कोणतीही व्यवस्था हिंदूंच्या धार्मिक संघटना, संस्था, संप्रदाय आदींनी निर्माण केलेली नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे. आदी शंकराचार्यांनी दीड सहस्र वर्षांपूर्वी हिंदु धर्माची पुनर्स्थापना करून धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदूंना ज्ञान मिळण्यासाठी भारताच्या चारही दिशांना धर्मपीठांची स्थापना केली अन् तेथे शंकराचार्यांची नियुक्ती केली. ही परंपरा आजही चालू आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे याच परंपरेतील शंकराचार्य होते. या पीठांकडूनही सध्याच्या विज्ञानवादी आणि पुरोगामित्वाच्या काळात व्यापक प्रमाणात ‘हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे’, अशी व्यवस्था करणे आवश्यक होते; मात्र ते झालेले नाही आणि त्यामुळे हिंदूंवर मोठे आघात होत आहेत अन् हिंदूच हिंदु धर्माचा आत्मघात करत आहेत, अशी आजची स्थिती आहे. ज्याप्रमाणे आदी शंकराचार्यांनी धर्माची पुनर्स्थापना केली, तशी पुनर्स्थापना आजही करण्याची आवश्यकता आहे. मुसलमानांच्या मोठमोठ्या धार्मिक संघटना फतवे काढून मुसलमानांनी ‘काय करावे आणि काय करू नये ?’ असे सांगतात अन् मुसलमान त्याचे पालन करतात; मात्र हिंदूंच्या अशा कोणत्याही धार्मिक संघटना किंवा धर्माचार्य हिंदूंनी ‘काय करावे आणि काय करू नये ?’, असे सांगत नाहीत. कुणी सांगितले, तरी हिंदूंचा त्यांच्यावर विश्वास किंवा श्रद्धा नसल्याने त्याचे पालन केले जात नाही. भारताला हिंदु राष्ट्र करण्याच्या मागणीला आता जोर चढत आहे. ‘येत्या काही वर्षांत भारत हिंदु राष्ट्र घोषित होणार आहे’, असे द्रष्टे संत सांगत आहेत. भारत जेव्हा हिंदु राष्ट्र घोषित होईल, तेव्हा सर्वप्रथम हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था युद्धपातळीवर करावी लागणार आहे; कारण आज समाजाची जी अधोगती झाली आहे, त्याला साधना न करणारे, धर्माचरण न करणारे, धर्माचे पालन न करणारे हिंदूच अधिक कारणीभूत आहेत. अशांना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून धर्मपालन, धर्माचरण करून घेतले की, आपसूकच देशातील अनेक समस्या दूर होतील आणि भारत रामराज्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल. यासाठी धर्माचार्य आदींना पुढे यावे लागणार आहे, हेही तितकेच खरे !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळून ते धर्माचरण करू लागले की, भारताची रामराज्याच्या दिशेने वाटचाल होईल !