ब्रज बसीलाल म्हणजे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि लेखक प्रा.बी.बी. लाल यांचे १० सप्टेंबर या दिवशी निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. त्यांचे नाव श्रीरामजन्मभूमीच्या खटल्याशी जोडले गेल्यावर अनेकांना त्यांच्याविषयी माहिती झाली. प्रा. लाल यांनी बाबरी ढाच्याच्या दक्षिण भागात उत्खनन करून मंदिराचे स्तंभ मिळाल्याचा पुरावा दिला. बाबरी ढाच्याजवळ स्तंभ मिळाल्याविषयी त्यांनी ७ पानांचा प्राथमिक अहवाल सिद्ध केला होता. हा अहवाल कुठेच मांडण्यात आला नव्हता. श्रीरामजन्मभूमीच्या खटल्याच्या वेळी बाबरी ढाच्याखाली मंदिराचे स्तंभ आढळणे, हा एक मुख्य पुरावा म्हणून न्यायालयात मांडण्यात आला. ‘न्यायालयाने तो ग्राह्य धरूनच बाबरीच्या जागी मंदिर होते’, हे मान्य केले आणि श्रीराममंदिराच्या बाजूने निकाल लागून आता श्रीराममंदिराचे काम वेगाने पूर्णत्वाला जात आहे. श्रीरामजन्मभूमी हिंदूंना परत मिळण्यात प्रा. लाल यांचे योगदान मोठे आहे.
बाबरीखाली मंदिर असल्याचे सांगणे
प्रा. लाल यांचा जन्म वर्ष १९२१ मध्ये झाशी येथे झाला. त्यांनी संस्कृत विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर त्यांचा ओढा पुरातत्व विभागात काम करण्याकडे होऊ लागला. तेथेच काम करतांना वर्ष १९६८ ते वर्ष १९७२ या कालावधीत ते भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक झाले आणि त्यांनी अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या जागेचे उत्खनन करण्याच्या योजनेचे नेतृत्व केले. प्रा. लाल यांना बाबरी ढाच्याखाली मंदिराचे खांब (स्तंभ) सापडल्यावर पुढील उत्खननाचे काम प्रशासनाकडून थांबवण्यात आले, तसेच तांत्रिक सुविधाही तेथून हटवण्यात आल्या. प्रा. लाल यांनी वारंवार पाठपुरावा करूनही तेथील काम चालू करण्यात आले नाही. त्यांनी ‘बाबरीखाली मंदिर आहे’, असा दावा केल्यामुळे अनेक साम्यवादी इतिहासकारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. प्रा. लाल यांच्या म्हणण्यानुसार, उत्खननात मंदिरातील खांबांप्रमाणे खांब सापडले असून त्यांचा वापर बाबरी मशिदीचा पाया बांधण्यासाठी केला. हिंदूंचा गौरवशाली इतिहास पुनरुज्जीवित होऊ नये, यासाठी त्यांना विरोध झाला; मात्र त्यांनी एका व्रतस्थ कर्मयोग्याप्रमाणे संशोधन चालू ठेवले. त्यांनी केलेल्या या संशोधनाचा लाभ पुढील पिढीला होईल, हे निश्चित !
प्रा. लाल यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या, नंदीग्राम, श्रुंगवेरापूर, भारद्वाज आश्रम आणि चित्रकूट या रामायणाशी संबंधित ठिकाणी उत्खनन करण्यात आले. या ठिकाणी केलेल्या उत्खननांमुळे भारताचा प्राचीन वारसा, गौरवशाली इतिहास जो साम्यवादी इतिहासकारांनी जगासमोर येऊ दिला नव्हता, तो पुन्हा जगासमोर आला. ‘राम, उनकी ऐतिहासिकता, मंदिर और सेतु: साहित्य, पुरातत्व और अन्य विज्ञान’ या त्यांच्या पुस्तकामुळे श्रीराममंदिराविषयीच्या वादावरील चर्चेची दिशाच पूर्णत: पालटून गेली. हडप्पा संस्कृती ते श्रीरामजन्मभूमीपर्यंतच्या शोधामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘आर्य भारतात बाहेरून आले, द्रविड हे भारताचे मूलनिवासी आहेत’, हा साम्यवाद्यांनी जाणूनबुजून निर्माण केलेला खोटा सिद्धांत मोडून काढण्यात प्रा. लाल यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या कार्यामुळे साम्यवाद्यांच्या मोठ्या रोषास त्यांना सामोरे जावे लागले; मात्र त्यांच्या विरोधाला भीक न घालता प्रा. लाल यांनी उत्खनन, संशोधन, संशोधनाची कागदपत्रे सिद्ध करणे हे कार्य कधी थांबवले नाही.
महाभारताचा अचूक भूगोल
त्यांनी केलेल्या अन्य उत्खननात हस्तिनापूर (उत्तरप्रदेश), शिशुपालगढ (ओडिशा), पुराना किल्ला (देहली), कालीबंगन (राजस्थान) यांचा समावेश आहे. महाभारताविषयी त्यांनी उत्खनन केले आहे. प्रा. लाल ‘महाभारतात दिलेला भूगोल अत्यंत अचूक आहे’, असे मानत. ऐतिहासिकदृष्ट्या तो शोधण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक वेळा केला. प्रा. लाल यांचे असे मानणे होते की, यमुनेचा प्रवाह पालटल्यामुळे प्राचीन काळी पांडवांनी त्यांची राजधानी पालटली. त्यांनी पुष्कळ शोध घेतल्यावर त्यांना त्यासंबंधी एक श्लोक महाभारतात मिळाला आणि त्या आधारे खोदकाम केल्यावर त्यांनी सिद्ध केले की, महाभारतकाळी पुष्कळ मोठ्या प्रमाणात महापूर आल्यामुळे आणि यमुनेचा प्रवाह पालटल्यामुळे पांडवांना त्यांची राजधानी दुसरीकडे हालवावी लागली. प्रा. लाल यांनी पुरातत्व विभागात काम करतांना केलेल्या संशोधनावर आधारित १५० हून अधिक संशोधनात्मक लेख (रिसर्च पेपर) आणि ५० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. वयाच्या शंभरीतही त्यांनी लिहिणे आणि वाचन करणे चालूच ठेवले होते. त्यांचे ‘ऋग्वेदीय जनता’ या विषयावरील पुस्तक काही दिवसांतच प्रकाशित होणार होते. त्यांना लिखाणाचा व्यासंग होता. पुरातत्वीय संशोधनातील योगदानामुळे वर्ष २००० मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ९ नोव्हेंबर २०२१ या दिवशी देशाचा दुसरा सर्वाेच्च सन्मान ‘पद्मविभूषण’ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
प्रा. लाल यांचा संदेश
अनेक प्राचीन मंदिरे, गड, दुर्ग यांची दुरवस्था पहाता ‘भारतीय पुरातत्व विभाग नेमके काय कार्य करतो ?’, असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. त्या पार्श्वभूमीवर प्रा. लाल यांचे कार्य दैदिप्यमान वाटते. त्यांनी ४ दशके या क्षेत्रात कार्य करून अनेक होतकरू पुरातत्वज्ञांना दिशा दिली आहे. प्रा. लाल यांनी नवीन पुरातत्वज्ञांना संदेश देतांना सांगितले, ‘तुम्हाला काय साध्य करायचे, हे प्रथम ठरवा, अभ्यास करा आणि नंतर उत्खनन करा. त्याचे परिणाम लवकरात लवकर प्रसिद्ध करा. कान आणि डोळे उघडे ठेवा.’ सध्याच्या पुरातत्वज्ञांनी प्रा. लाल यांचा हा संदेश कृतीत आणल्यास जी दु:स्थिती पुरातत्व विभाग आणि प्राचीन स्थळे यांची झाली आहे, ती पुन्हा कधी न होता, भारताचा प्राचीन गौरवशाली वारसा, प्रगल्भ हिंदु संस्कृती यांचे दर्शन जगाला होऊ शकेल.
पुरातत्व विभागाने प्रा. लाल यांच्यासारखे कार्य करून गौरवशाली भारताची जगाला ओळख करून द्यावी ! |