धर्मवीर संभाजी महाराज तलावामध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनास सोलापूर महापालिकेकडून निर्बंध !

कुंडातून बाहेर काढून भूमीवर ठेवण्यात आलेल्या श्री गणेशमूर्ती

सोलापूर, १० सप्टेंबर (वार्ता.) – येथे महापालिका प्रशासनाने धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या ठिकाणी पाण्याचे प्रदूषण रोखण्याच्या नावाखाली श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास निर्बंध घातले होते. तलावाच्या बाजूलाच प्रशासनाने कृत्रिम कुंड ठेवले होते. या वेळी सर्व मूर्ती कुंडामध्ये ३ वेळा बुडवून भूमीवर ठेवण्यात येत होत्या. त्यामुळे भाविकांनी १० दिवस श्रद्धेने पूजन केलेल्या मूर्तींची विटंबना होत होती. (पाण्यामध्ये ‘केवळ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने प्रदूषण होते’, असा कुठलाही अहवाल नसतांना कशाच्या आधारावर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना बंदी केली जात आहे ? – संपादक)

तलावांमध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करतांना गणेशभक्त

धर्मवीर संभाजी तलाव काही दिवसांपूर्वीच स्वच्छ केला असल्याने येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार नाही. या ठिकाणी संकलित केलेल्या सर्व मूर्ती महापालिकेच्या वाहनातून विसर्जनासाठी रामलिंगनगर येथे नेण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. (प्रत्यक्षात धर्मवीर संभाजी तलावामध्ये डे्रनेजचे पाणी येत असल्याने तलावातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, याकडे प्रशासन दुर्लक्ष करून केवळ ‘हिंदूंच्या सणांच्या वेळी श्री गणेशमूर्ती विसर्जनाने प्रदूषण होते’ असा कांगावा करत आहे, हे लक्षात घ्या. – संपादक)


श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी झालेले अयोग्य प्रकार !

१. महापालिकेचे कर्मचारी भाविकांच्या हातातून मूर्ती ओढून घेत होते. त्यामुळे काही भाविकांच्या श्री गणेशमूर्ती दुखावल्या गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

२. मूर्ती ३ वेळा पाण्यातून काढून खाली ठेवल्याने भाविकांनी १० दिवस श्रद्धेने पूजन केलेल्या मूर्तींची विटंबना होत होती.

३. महापालिकेने धर्मवीर संभाजी तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी आहे, तर अन्य पर्यायी ठिकाणांचे नाव असलेले फलक लावले नव्हते. त्यामुळे भाविकांचा संभ्रम होत होता.

४. महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव चालू झाल्यानंतर ३ फूट उंचीच्या श्री गणेशमूर्तींना शहरामध्ये विसर्जनास निर्बंध घोषित केल्याने काही गणेशोत्सव मंडळांचा मूर्ती विसर्जनाविषयी संभ्रम होत होता.


विधीवत् विसर्जन व्हावे, यासाठी भक्तांनी श्री गणेशमूर्तींचे केले तलावात विसर्जन !

महापालिकेने प्रथमच निर्बंध घालून तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विधीवत् विसर्जन करण्यास निर्बंध घातल्याने गणेशभक्त अप्रसन्न होते. त्यामुळे त्यांनी तलावातच विसर्जन करणे पसंत केले. (यावरून हे निर्बंध स्थानिक भक्तांनाही मान्य नाहीत, हे लक्षात घेऊन भाविकांच्या धार्मिक भावनांचा विचार प्रशासन कधी करणार ? – संपादक)