२० कोटींची खंडणी मागितल्याचे उघडकीस, प्रेमप्रकरणाचेही कारण
पिंपरी (जिल्हा पुणे) – येथील सोसायटीच्या वाहनतळामध्ये खेळत असलेला बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आदित्य ओगले याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे, ही घटना ९ सप्टेंबरच्या रात्री विलंबाने उघडकीस आली. या प्रकरणी त्याचे वडील गजानन ओगले यांनी ८ सप्टेंबर या दिवशी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपी मंथन भोसले याने साथीदार अनिकेत समुद्रे याच्या साहाय्याने आदित्यची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह भोसरी एम्.आय.डी.सी. येथील एका आस्थापनाच्या पडक्या इमारतीच्या गच्चीवर फेकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी मंथन आणि अनिकेत यांना अटक केली आहे.
आरोपींनी गजानन ओगले यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे आरोपींनी केवळ पैशांसाठी आदित्यची हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले; मात्र नंतर आरोपीचे हत्या केलेल्या मुलाच्या बहिणीशी प्रेमप्रकरण चालू होते. तरुणीशी झालेल्या वादातून आरोपीने कट रचून आदित्यची हत्या केल्याची माहिती आहे. आरोपी आणि ओगले कुटुंबीय एकाच सोसायटीमध्ये रहातात.
संपादकीय भूमिकापैसे आणि प्रेमप्रकरणामुळे लहान मुलाची हत्या केली, यातून समाज दिवसेंदिवस किती निर्दयी आणि स्वार्थी होत आहे, याचे हे उदाहरण ! या प्रसंगातून समाज नीतीवान होण्यासाठी धर्मशिक्षणाचीच आवश्यकता किती आहे, हे पुन्हा अधोरेखित होते ! |