सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

श्री. शंभू गवारे

१. शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या समवेत रेल्वेने प्रवास करतांना स्वच्छतागृहाच्या दुर्गंधामुळे ‘जेवू नये’, असे वाटणे आणि सद्गुरुदादांनी जेवायला आरंभ केल्यावर त्याचा मनावर परिणाम होऊन त्यानंतर अशा प्रकारचे विचार मनात परत न येणे : ‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मला त्यांच्या आचरणातून पुष्कळ गोष्टी शिकवल्या. मी अनेक वर्षांत रेल्वेने प्रवास केला नव्हता. उत्तर भारतात कुठेही जायचे असेल, तरी अनेक घंटे रेल्वेने प्रवास करावा लागतो. त्यामुळे मी पूर्णवेळ धर्मप्रचार करू लागल्यावर रेल्वेचा प्रवास करतांना माझ्या मनात तेथील अस्वच्छतेमुळे गाडीत काही खाण्याविषयी फार संघर्ष व्हायचा. मी उत्तर भारतात पहिला मोठा प्रवास सद्गुरु नीलेशदादांच्या समवेत केला. गाडीत बसल्यावर त्यांनी मला ‘हात धुवून जेवायला बसूया’, असे सांगितले. तेव्हा मला स्वच्छतागृहाच्या दुर्गंधामुळे ‘जेवण करू नये’, असे वाटत होते; परंतु सद्गुरु नीलेशदादांनी हात धुवून जेवायला आरंभ केला. त्या कृतीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि त्यानंतर अशा प्रकारचे विचार माझ्या मनात परत कधी आले नाहीत.

१ आ. एका हिंदुत्वनिष्ठाकडे निवासाला गेलो असता तेथील झोपायची खोली अनेक दिवस वापरात नसल्याने अस्वच्छ असणे आणि तेथील मोडकळीला आलेल्या पलंगावरही सद्गुरुदादा झोपलेले पाहून स्वतःच्या अयोग्य विचारांची जाणीव होणे : एकदा सद्गुरु नीलेशदादा, मी आणि एक धर्मप्रेमी मेघालयातील शिलाँगमध्ये एका हिंदुत्वनिष्ठाकडे निवासाला होतो. ती जागा अनेक दिवस वापरात नसल्याने खोलीत अस्वच्छता होती. तेथे एक मोडकळीला आलेला पलंग होता. त्यावर गादी घातली होती आणि जेमतेम ३ माणसे दाटीवाटीने झोपू शकतील, एवढीच जागा होती. तेव्हा ‘सद्गुरुदादा या पलंगावर कसे झोपतील ? आम्ही तिघे या ठिकाणी कसे झोपणार?’, असे विचार माझ्या मनात आले. तेव्हा सद्गुरुदादा म्हणाले, ‘‘ही जागा फार चांगली आहे. मी यापेक्षाही कठीण परिस्थितीत झोपलो आहे.’’ असे म्हणून ते झोपले. हे पाहून मला परात्पर गुरुदेव आणि सद्गुरुदादा यांच्या प्रती कृतज्ञता वाटली. नंतर मीसुद्धा शांतपणे झोपलो. सद्गुरुदादांना मुळीच देहबुद्धी नाही’, असे मला त्यांच्या या कृतीतून लक्षात आले. या प्रसंगाचा मला नंतर लाभ झाला. माझ्या मनात जेव्हा देहबुद्धीविषयी विचार येतात, तेव्हा मी हा प्रसंग आठवतो.

१ इ. सद्गुरुदादांशी बोलल्यावर मनातील न्यूनगंड दूर होणे : मला कधी सार्वजानिक ठिकाणी अनेक लोकांसमोर बोलणे जमत नसे. तेव्हा ‘मला व्यवस्थित बोलता येत नाही’, असे मला वाटायचे. याविषयी मी सद्गुरुदादांशी बोललो. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण काही श्री. रमेश शिंदे (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते) किंवा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे (हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक) यांच्यासारखे चांगले वक्ते नाही; मात्र आपण मन लावून सराव करायचा आणि गुरुदेवांवर सोडायचे.’’ या सूत्राचा मला लाभ झाला. त्यानंतर माझ्या मनातील सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा हा न्यूनगंड पुष्कळसा दूर झाला.

१ ई. इतरांचा विचार करणे : सद्गुरुदादा प्रत्येक प्रसंगात नेहमी धर्मप्रेमींचा विचार करतात. पुष्कळ वेळा मला जेव्हा ‘एखाद्या प्रसंगात काय करावे ?’, हे लक्षात येत नाही, त्या वेळी मी ‘सद्गुरुदादांनी या प्रसंगात काय दृष्टीकोन दिला असता ?’, असा विचार करतो आणि या विचाराने  मनाला उत्साह वाटून मला तो प्रसंग हाताळता येतो.

१ उ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये असलेले दैवी गुण 

सद्गुरुदादा, म्हणजे नम्रता ।
सद्गुरुदादा, म्हणजे कृतज्ञता ।
सद्गुरुदादा, म्हणजे भाव ।
सद्गुरुदादा, म्हणजे आदर्श कृती ।
सद्गुरुदादा, म्हणजे परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा ।।

पू. नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदी विराजमान झाल्यानंतर घडलेले त्यांच्यातील उच्च भावाचे दर्शन !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदी विराजमान झाल्यानंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांचा सन्मान केला. त्यानंतर त्यांनी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. त्यानंतर सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या उत्तराधिकारी असलेली त्यांची पत्नी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. या वेळी त्यांच्यातील उच्च भावाचे दर्शन साधकांना घडले !

२. अनुभूती

२ अ. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सद्गुरुपदाचा सन्मान सोहळा चालू असतांना मला ‘तो सोहळा आश्रमात होत नसून शिव लोकात होत आहे’, असे वाटत होते.

२ आ. सन्मान सोहळ्याच्या वेळी वातावरण पुष्कळ आल्हाददायक वाटत होते आणि तिथे वेगळ्या प्रकारचा गारवाही जाणवत होता.

२ इ. ‘सोहळा चालू असलेल्या चित्रीकरणकक्षाचा आकार मोठा झाला असून आकाशतत्त्वाच्या मोठ्या पोकळीत हा सोहळा चालू आहे’, असे वाटणे : सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान सोहळा झाला. सोहळा चालू असतांना चित्रीकरणकक्षाचा आकार पुष्कळ मोठा झाल्याचे जाणवत होते. तो दृष्टीत मावत नव्हता. त्या वेळी ‘आकाशतत्त्वाची मोठी पोकळी सिद्ध झाली असून तिच्यात हा सोहळा चालू आहे’, असे मला वाटले. हे पाहून मनाला आनंद जाणवत होता.

२ ई. पुष्कळ वेळ भावावस्था अनुभवणे : आतापर्यंत मी भावजागृतीचे प्रसंग फारसे अनुभवले नव्हते. पू. नीलेश सिंगबाळ यांना सद्गुरुपद प्राप्त झाल्याची घोषणा होण्यापूर्वी आणि नंतरही मला भावावस्था अनुभवता येत होती. मला अशी भावस्थिती प्रथमच अनुभवता आली. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर, सर्व संत आणि सद्गुरु नीलेशदादा यांच्या प्रती कृतज्ञता वाटत होती.’

– श्री. शंभू गवारे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती. (२.७.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक