भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमन ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून नियुक्त

बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचा पराभव होऊन लिझ ट्रस विजयी झाल्या. आता ट्रस यांनी ब्रिटनच्या गृहमंत्री म्हणून एका भारतीय वंशाच्या महिलेची नियुक्ती केली आहे. बॅरिस्टर सुएला ब्रेव्हरमन असे त्यांचे नाव आहे. ४२ वर्षीय सुएला यांनी यापूर्वी ब्रिटन सरकारमध्ये अनेक पदांवर काम केले आहे. याआधी त्या बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अ‍ॅटर्नी जनरल म्हणून कार्यरत होत्या.

ब्रेव्हरमन यांना २ मुले आहेत. त्यांची आई हिंदु तमीळ असून त्या मूळच्या गोव्याच्या आहेत. त्यांची आई मॉरिशसमधून ब्रिटनला गेली होती, तर त्यांचे वडील  १९६० च्या दशकात केनियामधून स्थलांतरित झाले. सुएला ब्रेव्हरमन यांनी केंब्रिज विद्यापिठातून कायद्याची पदवी घेतली आहे. वर्ष २०१८ मध्ये त्यांनी रॉयल ब्रेव्हरमन यांच्याशी विवाह केला. त्या बौद्ध धर्मीय आहेत.