राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

नवी देहली – राजकीय पक्षांकडून धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या होणार्‍या वापरावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सय्यद वसीम रिझवी यांनी सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट केली आहे. या याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.

राज्यघटनेचा संदर्भ देत रिझवी यांनी ‘धर्माच्या आधारे मतदारांना आकर्षित करणे अवैध आहे’, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकादाराच्या वतीने अधिवक्ता गौरव भाटिया यांनी न्यायालयात बाजू मांडली. या प्रकरणी पुढील सुनावणी १८ ऑक्टोबरला होणार आहे.  या याचिकेत २ राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा संदर्भ देण्यात आला आहे. या पक्षांच्या नावात ‘मुस्लिम’ हा शब्द आहे, तसेच काही राजकीय पक्षांनी त्यांच्या झेंड्यांवर चंद्र-तारे लावले आहेत. यामध्ये ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’चे (‘आय.यू.एम्.एल्.’चे) उदाहरण देण्यात आले आहे. या पक्षाचे लोकसभा आणि राज्यसभा येथे खासदार अन् केरळच्या विधानसभेत आमदार आहेत.