मुंबादेवी येथे मनसेच्या उपविभाग प्रमुखाकडून महिलेला मारहाण !

मुंबई – मुंबादेवी परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरून एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित होत आहे. मनसेचे उपविभागप्रमुख विनोद अरगिले यांनी मारहाण केल्याचा आरोप करत या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे; मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका ठिकाणी गणपतीचा मंडप उभारला जात होता. त्याच ठिकाणी फलक (बॅनर) लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांच्या समोर बांबू लावले जात होते. तेथील एका औषधाच्या दुकानासमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्या वेळी तेथील एका महिलेने त्यांना विरोध केला. त्या वेळी अरगिले यांनी त्या महिलेला मारहाण केली.

‘ही महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिने अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली. महिलेने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या प्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार केली आहे’, असे अरगिले यांनी सांगितले.