वरपक्षाने वधूपक्षाकडून कन्या द्रव्य (ओझे) घेण्याची अनिष्ट प्रथा पूर्णतः बंद होणे आवश्यक !

पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे श्री गणेशचतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने संदेशातून आवाहन

सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

कुंडई, ३० ऑगस्ट – सनातन वैदिक हिंदु धर्मामध्ये श्री गणेशचतुर्थी उत्सवाला विशेष महत्त्व आहे. देशभरात विविध राज्यांत श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने नवविवाह सोहळा संपन्न झालेल्या कुटुंबांमध्ये वरपक्षाने वधूपक्षाकडून कन्या द्रव्य (ओझे) घेण्याची पद्धत अजूनही चालू आहे. ही अनिष्ट प्रथा पूर्णतः बंद होणे आवश्यक आहे, असे आवाहन पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी श्री गणेशचतुर्थी उत्सवाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशातून केले आहे.
ते पुढे म्हणतात, ‘‘सनातन वैदिक हिंदु धर्मात नवविवाह सोहळा संपन्न झालेल्या कुटुंबांमध्ये वरपक्षाने वधूपक्षाकडून कन्या द्रव्य (ओझे) घेण्याची प्रथा कुठेही सांगितलेली नाही. आजचा समाज सुशिक्षित आणि सुसंस्कारित आहे. हिंदूंनी शास्त्रानुरूप जीवन जगण्याची पद्धत नक्कीच चालू करावी आणि अशा कन्या द्रव्य (ओझे) घेण्याच्या, तसेच देण्याची अनिष्ट प्रथा पूर्णतः बंद करावी. सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामीजी यांचे ‘ऐपत पाहुनी खर्च करावा, कन्या द्रव्य घेऊ नये । कन्या द्रव्य घेती देती, मंडपि त्यांच्या जेवू नये ।।’, असे बोधवाक्य आहे. हिंदु समाजाने यावर विचार करणे आवश्यक आहे. गणेशभक्तांनी चुकीच्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच साधू, संत आणि ॠषिमुनी यांनी घालून दिलेल्या सणउत्सवांच्या मांदियाळीनुसार निसर्गानुकूल चतुर्थीउत्सव साजरा करावा. हिंदूंनी हिंदु धर्माप्रती सार्थ अभिमान बाळगून त्या प्रकारे आपले आचरण ठेवावे. याद्वारेच आपल्या संस्कृतीचे संरक्षण होणार आहे. यंदाच्या श्री गणेशचतुर्थीपासून कन्याद्रव्य घेण्या-देण्याची अनिष्ट प्रथा बंद करून आणि घरोघरी गणरायांची शास्त्रोक्त पूजाअर्चा, आराधना, जयजयकार करून मोठ्या उत्साहात श्री गणेशचतुर्थी साजरी करावी.’’