‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या विषयावर ‘आरोग्य साहाय्य समिती’द्वारे ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
(‘ट्रेड मार्जिन कॅप’ म्हणजे १०० रुपयांचे औषध हे अधिकतम १३० रुपयांना विकू शकतो.)
मुंबई – औषधांचे अधिकतम मूल्य (एम्.आर्.पी.) अधिक असावे, यासाठी घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते यांचा औषधनिर्मिती अन् विक्री करणार्या फार्मा कंपन्यांवर मोठा दबाव आहे. याचसमवेत रुग्णालये, डॉक्टर्स आदींचाही या साखळीत असणारा सहभाग आणि ‘एम्.आर्.पी.’ या दोन्हींवर केंद्र सरकारचे कुठलेही नियंत्रण नाही. त्यामुळे ग्राहकांना औषधे मनमानी पद्धतीने चढ्या दरांत विकली जात आहेत. लोकसुद्धा ‘एम्.आर्.पी.’वर केंद्रशासनाचे नियंत्रण आहे’, अशा भ्रमात राहून औषधे खरेदी करत आहेत. उदाहरणार्थ कर्करोगावरील औषधांना ३० टक्क्यांचा ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लावला आहे; मात्र अशी औषधे पुष्कळ चढ्या दरात विकली जात आहेत. सामान्य जनतेची होणारी ही लूट थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सर्व प्रकारची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांवर ‘ट्रेड मार्जिन कॅप’ लागू करावा. यामुळे औषधे ८० ते ९० टक्के दराने स्वस्त मिळतील, अशी मागणी तेलंगाणा येथील उद्योगपती आणि ‘निजामाबाद चेंबर्स ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष
श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी केली आहे. हिंदु जनजागृती समितीची ‘आरोग्य साहाय्य समिती’ आणि ‘सुराज्य अभियान’ यांनी आयोजित केलेल्या ‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या ‘ऑनलाईन विशेष संवादा’मध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी श्री. सोमानी यांच्याशी संवाद साधला.
श्री. पुरुषोत्तम सोमानी यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
१. बहुतांश जनतेला हे ठाऊक नसते की, बाजारातील अनेक औषधे ही ‘जेनेरिक’ (अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, गुणवत्ता आणि उपयोग हे नामांकित औषधांसारखे असते; पण त्याला विशिष्ट नाव नसते. या औषधांचे मूल्य अल्प असते.) आहेत; मात्र अनेक प्रसिद्ध औषधनिर्मिती आस्थापने ती औषधे स्वत:चे नाव (ब्रँड) लावून अधिक दराने विकतात.
२. ही ‘ब्रँडेड’ औषधे अधिक दरात विकली जातात. जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांप्रमाणेच उच्च दर्जाची असतात; मात्र लोकांचा डॉक्टरांवर अतीविश्वास असल्याने लोक डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधेच घेतात. जेनेरिक औषधांवर सवलतसुद्धा अधिक प्रमाणात मिळते.
३. आता सर्वत्र ‘प्रधानमंत्री जनऔषधी दुकाने’ आहेत. या दुकानांत ‘एम्.आर्.पी.’ अल्प ठेवून औषधे मिळतात. लोकांनी प्राधान्याने ‘प्रधानमंत्री जनऔषधी दुकानां’तून किंवा जेनेरिक औषधे घ्यावीत.’
४. आपल्या देशात लोकांमध्ये जागरूकता नसल्याने औषधनिर्मिती आस्थापने समाजाची दिशाभूल करत आहेत. परिणामी सामान्य जनतेची प्रचंड हानी होत आहे, तसेच काळ्या पैशांची निर्मितीही होत आहे. याविषयी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याशी पत्रव्यवहारही केला आहे.
५. आता जनतेने आणि विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार अन् लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन सरकारवर दबाव टाकण्याची आवश्यकता आहे.