मुलांवर चांगले संस्कार करणार्‍या आणि देवावर दृढ श्रद्धा असलेल्या साकुरी (जिल्हा नगर) येथील (कै.) श्रीमती लक्ष्मीबाई भीमराज उपाध्ये (वय ९० वर्षे)!

२०.८.२०२२ या दिवशी पुणे येथील सनातनच्या साधिका सौ. अनुराधा अभिमन्यू रुईकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६२ वर्षे) यांच्या आई साकुरी (जिल्हा नगर) येथील श्रीमती लक्ष्मीबाई भीमराज उपाध्ये (वय ९० वर्षे) यांचे निधन झाले. २९ आणि ३०.८.२०२२ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अनुक्रमे १० अन् ११ वा दिवस आहे. त्यानिमित्त सौ. अनुराधा रुईकर यांना त्यांच्या आईविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. बालपण

(कै.) श्रीमती लक्ष्मीबाई उपाध्ये

‘आईचे बालपण नगर जिल्ह्यातील शिऊर या गावात गेले. तिचे शिक्षण इयत्ता दुसरीपर्यंत झाले असले, तरी तिचे व्यवहारज्ञान उत्तम होते. ती श्री संत शिवाई (टीप) यांच्या सहवासात वाढल्यामुळे बालपणापासूनच तिला अध्यात्माची आवड होती.

टीप – नगर जिल्ह्यातील शिऊर या गावात श्री संत शिवाई नावाच्या संत होऊन गेल्या. आता शिऊर गावामध्ये त्यांची समाधी बांधली आहे.

२. वैवाहिक जीवन

सौ. अनुराधा रुईकर

लहान वयातच आईचा विवाह साकुरी (जिल्हा नगर) येथील सधन शेतकरी कुटुंबातील श्री. भीमराज दादा उपाध्ये यांच्याशी झाला. त्यांचे एकत्र कुटुंब होते. आईला सासरी पुष्कळ कष्ट सहन करावे लागले; पण तिने कुटुंबाचा सर्व भार पांडुरंगाच्या चरणी सोपवला होता. तिचा सतत ‘रामकृष्णहरि ।’, असा नामजप चालू असायचा. आम्ही ४ बहिणी – सौ. सुगंधा माधव जोर्वेकर (वय ७३ वर्षे), सौ. सुमन चांगदेव अष्टेकर (वय ७१ वर्षे), श्रीमती हिराबाई ज्ञानेश्वर थोरात (वय ६६ वर्षे) आणि सौ. अनुराधा अभिमन्यू रुईकर (वय ६२ वर्षे) अन् ५ भाऊ – सर्वश्री बापूसाहेब भीमराज उपाध्ये (वय ६९ वर्षे), धोंडीराम भीमराज उपाध्ये (वय ६४ वर्षे), कैलास भीमराज उपाध्ये (वय ५८ वर्षे), विलास भीमराज उपाध्ये (वय ५६ वर्षे) आणि संजय भीमराज उपाध्ये (वय ५४ वर्षे), अशी ९ भावंडे आहोत. तिने आम्हा सर्व भावंडांवर चांगले संस्कार केले. तिच्यामुळे आम्हा सर्व भावंडांमध्ये साधनेची आवड निर्माण झाली.

३. मुलांवर चांगले संस्कार करणे

आजही माझे ५ भाऊ एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने रहातात. माझ्या भावांनी ‘आई-वडील हे ‘लक्ष्मी-नारायण’ आहेत’, या भावाने त्यांची सेवा केली. आईने केलेल्या संस्कारांमुळेच घरची परिस्थिती चांगली असूनही माझ्या भावांमध्ये अहं जाणवत नाही. आईमुळे त्यांच्यावर ‘दानधर्म करणे, पंढरीची वारी करणे’ इत्यादी चांगले संस्कार झाले. पंचक्रोशीत आमच्या कुटुंबाचे ‘आदर्श कुटुंब’ म्हणून नाव आहे. यावरून मला दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका अंकातील ‘जिथे ४ पिढ्या गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात, तिथे स्वर्ग असतो’, हे वाक्य आठवते.

४. वाईट शक्तींचा त्रास होऊनही देवावरील दृढ श्रद्धेमुळे रक्षण होणे 

४ अ. आईला वाईट शक्तींचा त्रास होत असल्याने तिने बाहेर कुठेही न जाणे; मात्र ती पैठणला एकटी जाऊन गोदावरीस्नान करून येत असणे : वर्ष १९८५ पासून आईला वाईट शक्तींचा त्रास होऊ लागला. तिला आमच्या घरात आणि घराभोवती वाईट शक्ती दिसत असत. त्यामुळे घाबरून ती त्यांना दगड मारत असे आणि घराच्या दारे-खिडक्या लावून घेत असे. घरातील मौल्यवान वस्तू किंवा पैसे लपवून ठेवत असे. रात्रभर ती त्या वाईट शक्तींना अपशब्द बोलत असे. या त्रासामुळे ती घर सोडून बाहेर कुठेही जात नसे. त्याही परिस्थितीत ती एकटी पैठणला जाऊन गंगास्नान (गोदावरी स्नान) करायची. कुटुंबियांना तिची काळजी वाटायची; परंतु ती तिच्या श्रद्धेच्या बळावर सुखरूप घरी परत यायची.

४ आ. आईचा त्रास वाढल्याने वडिलांनी तिला शिंगवे येथील दत्तक्षेत्री नेणे आणि तिच्या समवेत दत्तक्षेत्री राहून सेवा केल्यामुळे वडिलांना दत्तगुरूंचे दर्शन होणे : आईचा त्रास अधिकच वाढल्यामुळे बाबांनी तिला नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील शिंगवे या गावातील दत्त मंदिरात आणले. (शिंगवे या गावात दत्ताचे जागृत मंदिर आहे. वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या व्यक्ती तिथे राहून साधना करतात.) ३ वर्षे माझे बाबाही तिथे आईच्या समवेत राहून सेवा करत होते. एकदा पहाटे मंदिर परिसर झाडत असतांना वडिलांना दत्तगुरूंचे दर्शन झाले.

या काळात आईचा दत्तगुरूंचा नामजप अखंड चालू असे. बर्‍याचदा ती करत असलेल्या नामजपामुळे आमच्या कुटुंबावर आलेली मोठी संकटे दूर झाली आहेत; मात्र तिचे बडबडणे शेवटपर्यंत न्यून झाले नाही.

४ इ. ‘मिरवलीबाबां’च्या पहाडावरून गाडीने उतरतांना गाडीचे ब्रेक निकामी होणे, आईने दत्तगुरूंचा धावा करणे आणि त्यानंतर गाडी एका मोठ्या दगडाला अडकून थांबल्याने गाडीतील सर्वांचे प्राण वाचणे : नगर येथे ‘मिरवलीबाबा’ म्हणून एक पिराचे स्थान आहे. तेथे वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या लोकांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी नेले जाते. आईला तेथे वाईट शक्तींच्या त्रासावरील आध्यात्मिक उपायांसाठी नेले होते. मिरवलीबाबांच्या पहाडावरून उतरतांना गाडीचे ब्रेक निकामी झाले. आई त्या गाडीत होती. गाडी उतारावरून जोरात खाली जाऊ लागली. पुढे पुष्कळ यात्रेकरू पायी चालत होते. तेव्हा आई ‘दत्तबाबा धाव, दत्तबाबा धाव’, असा दत्तगुरूंचा धावा करत असतांना गाडी एका मोठ्या दगडाला अडकून थांबली आणि गाडीतील सर्वांचे प्राण वाचले.

५. पतीची सेवा करणे

१५.३.२०२२ या दिवशी माझ्या वडिलांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. आईने शेवटपर्यंत त्यांची सेवा केली.

६. आईचे शेवटचे आजारपण

शेवटी आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले; पण तिच्या वयामुळे तिच्यावर कोणतेही उपचार करता येत नव्हते. तिला झोपून रहावे लागले, तरीही ती सतत हसतमुख असायची. नातेवाईक तिला भेटायला आल्यावर ती प्रत्येकाच्या तोंडावरून हात फिरवून त्यांना नमस्कार करायची. त्यांची विचारपूस करून त्यांना ‘चहा-पाणी घेतले का ?’, असे विचारायची, तर कधी ‘जेवूनच जा’, असे म्हणायची. तिच्यातील प्रेमभाव पाहून सर्वांना गहिवरून यायचे. अलीकडे तिचा सतत ‘विठ्ठल, विठ्ठल’, असा नामजप चालू असायचा.

‘देवाच्या कृपेने आम्हा भावंडांना हसतमुख आणि मायेचा सागर असलेली आई लाभली’, त्यासाठी श्रीकृष्ण अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, आईच्या संदर्भात तुम्हाला अपेक्षित असेच होऊ द्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !

– सौ. अनुराधा अभिमन्यू रुईकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६२ वर्षे), पुणे (२७.८.२०२२)