उजनी धरणातून ३२ लाख युनिट वीजनिर्मिती !

सोलापूर – उजनी धरण सध्या १०० टक्के भरले असून ११ ऑगस्टपासून उजनी धरणातून ‘पॉवर हाऊस’साठी १ सहस्र ६०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडले जात आहे. त्यातून ३२ लाख युनिट वीज सिद्ध करण्यात आली आहे. महावितरणच्या १३२ केव्ही इंदापूर उपकेंद्रांना वीज दिली जाते. उजनी धरणात सध्या एकूण पाणीसाठा ११७.५३ टी.एम्.सी. आहे, तर धरणात पाण्याचा जिवंतसाठा ५३.८७ टी.एम्.सी. आहे. धरणात दौंडवरून येणारा विसर्ग अल्प झाल्याने नदीतून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे.

सध्या कॅनॉलमधून २ सहस्र ५०० घनफूट प्रतिसेकंद आणि १ सहस्र ६०० घनफूट प्रतिसेकंद पाणी सोडले जात आहे. प्रतिदिन सरासरी २ लाख ९० सहस्र युनिट विजेची निर्मिती त्या ठिकाणी होत आहे. आतापर्यंत सवाकोटी रुपयांची वीजनिर्मिती झाल्याचा अंदाज आहे. आणखी काही दिवस पॉवर हाऊस चालू रहाणार आहे. दौंडवरून येणारा विसर्ग वाढल्यास पुन्हा नदीतून पाणी सोडले जाणार आहे.