भगवान श्रीविष्णूचे अवतार वराहाचे दिव्य स्वरूप !

आज भाद्रपद शुक्ल तृतीयेला (३० ऑगस्ट २०२२) ‘वराह जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

प्रस्तुत लेखामध्ये श्रीविष्णूचा तिसरा अवतार भगवान वराह याचे अलौकिक स्वरूप अत्यंत भावपूर्ण रूपाने कथन करण्यात आले आहे. आज असलेल्या वराह जयंतीच्या निमित्ताने ‘कल्याण’ मासिकातील हा लेख आमच्या वाचकांसाठी साभार प्रसिद्ध करत आहोत.

१. सुमेरू पर्वताच्या शिखरावर असलेल्या ब्रह्मदेवाचे अत्यंत प्रकाशमान, दिव्य अन् विस्तृत भवन

‘प्राचीन युगातील गोष्ट आहे. एके दिवशी मुनिश्रेष्ठ नारद नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित असलेल्या सुमेरू पर्वताच्या शिखरावर गेले. तिथे त्यांनी शिखराच्या मध्यभागी असलेले ब्रह्मदेवाचे अत्यंत प्रकाशमान दिव्य अन् विस्तृत भवन पाहिले. त्याच्या उत्तर भागात पिंपळाचा एक उत्तम वृक्ष होता. त्याची उंची एक सहस्र योजने आणि विस्तार त्याच्या दुप्पट होता. त्या पिंपळाच्या मुळाजवळ अनेक प्रकारच्या रत्नांनी युक्त असा दिव्य मंडप होता. त्यामध्ये वैदूर्य, मोती आणि मणी यांच्याद्वारे स्वस्तिक गृह बनवले होते. तो दिव्य मंडप नूतन रत्नांनी चिन्हे आणि दिव्य तोरणांनी (बाहेरच्या प्रवेशद्वारावर) सुशोभित केला होता. त्याचे मुख्य द्वार पुष्परागाने (एक प्रकारचे रत्न) बनवले होते, ज्याचे गोपूर सात माळ्यांचे होते. चमकणार्‍या हिर्‍यांनी बनवलेले दोन दरवाजे त्या द्वाराची शोभा वाढवत होते. त्या मंडपात प्रवेश केल्यावर नारदाने पाहिले, ‘दिव्य मोत्यांचा एक मंडप आहे, त्यात वैदूर्य मण्याची वेदि बनवली आहे.’ महामुनि नारद त्या उंच मंडपावर चढले. तेथे वर मंडपाच्या मध्यभागी ज्याची कुणी तुलनाच करू शकत नाही, असे एक पुष्कळ उंच सिंहासन होते. त्याच्या मध्यभागी सहस्रदलांनी सुशोभित दिव्यकमळ असून त्याचा रंग शुभ्रधवल होता. त्याची प्रभा सहस्रो चंद्रांसमान होती.

२. भगवान वराहाचे दिव्य स्वरूप

त्या कमळाच्या मध्ये दहा सहस्र पूर्ण चंद्रांपेक्षाही अधिक कांतीमान, कैलास पर्वतासमान आकाराचा एक सुंदर पुरुष बसला होता. त्याला चार भुजा होत्या, त्याच्या अंग-प्रत्यंगातून उदारता टपकत होती. त्याचे मुख वराहासमान होते. ते परम सुंदर भगवान् पुरुषोत्तम आपल्या चारही हातांमध्ये शंख, चक्र, अभयमुद्रा आणि वरदमुद्रा धारण केलेले होते. त्यांच्या कटिभागात पितांबर शोभून दिसत होता. दोन्ही नेत्र कमलदलासमान विशाल होते. त्यांचे सौम्य मुख पूर्ण चंद्राच्या सौंदर्यालाही मागे टाकत होते. त्यांच्या मुखारविंदातून (कमळाप्रमाणे असणार्‍या सुंदर मुखातून) धूपासारखा सुगंध निघत होता. सामवेद त्यांचा ध्वनी, यज्ञ त्यांचे स्वरूप, स्रुक् (टीप) त्यांचे मुख होते आणि स्रुवा (टीप) त्यांची नासिका होती. मस्तकावर धारण केलेल्या मुकुटाच्या प्रकाशाने त्यांचे मुख अत्यंत उजळलेले दिसत होते. त्यांच्या वक्षःस्थानी श्रीवत्साचे चिन्ह सुशोभित होते. श्वेत यज्ञोपवीत धारण केल्यामुळे त्यांच्या श्रीअंगांची शोभा आणखीनच वाढली होती. त्यांची छाती रुंद आणि विशाल होती. ते कौस्तुभ मण्याच्या दिव्य प्रभेमुळे दैदीप्यमान दिसत होते. ब्रह्मा, वसिष्ठ, अत्रि, मार्कंडेय आणि भृगु इत्यादी अनेक मुनीश्वर रात्रंदिवस त्यांच्या सेवेत मग्न होते. इंद्र इत्यादी लोकपाल आणि गंधर्व त्यांच्या सेवेत होते. अशा देवदेवेश्वर भगवंताच्या जवळ जाऊन नारदाने नमस्कार केला आणि पृथ्वीला धारण करणार्‍या त्या वराह भगवंताचे दिव्य उपनिषद्-मंत्रांनी स्तवन करून त्यांना अत्यंत प्रसन्न केले अन् ते त्यांच्या जवळच उभे राहिले.’

टीप – ‘स्रुक्’ आणि ‘स्रुवा’ या यज्ञाच्या वेळी वापरायच्या वेगवेगळ्या लाकडी पळ्यांची नावे आहेत.

(साभार : मासिक ‘कल्याण’, श्रीस्कन्द-महापुराण, वैष्णवखण्ड, सप्टेंबर २०१६)