ज्ञानवापीप्रमाणे मथुरा श्रीकृष्णजन्मभूमीचे सर्वेक्षण करण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – वाराणसीच्या ज्ञानवापी आणि शृंगारगौरी मंदिरानंतर  आता मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी आणि त्यावरील शाही ईशगाह मशीद यांचे चित्रीकरण करण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पीयूष अग्रवाल यांच्या खंडपिठाने दिला आहे. येत्या ४ मासांत हे चित्रीकरण पूर्ण करून सर्वेक्षणचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासाठी न्यायालय आयुक्तपदी एका ज्येष्ठ अधिवक्त्यांची, तर साहाय्यक आयुक्तपदी २ अधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या सर्वेक्षण आयोगात वादी आणि प्रतिवादी यांच्यासह सक्षम अधिकारी सहभागी असतील.

काय आहे प्रकरण ?

मथुरेच्या जिल्हा न्यायालयात अर्ज प्रविष्ट करून श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही इदगाह मशीद यांच्या जागेचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी भगवान श्रीकृष्ण विराजमानने केली होती. एक वर्षानंतरही या अर्जावरील सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. याचिकाकर्ते मनीष यादव यांनी नुकताच अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट करून ‘सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करावी’, अशी मागणी केली होती. या अर्जावर सुनावणी करतांना उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाकडून अहवाल मागवला होता. त्यावर न्यायालयाने वरील निर्णय दिला.