अयोध्येतील श्रीराममंदिराचे काम ४० टक्के पूर्ण

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराममंदिराचे काम ४० टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२३ पासून मंदिरात दर्शन शक्य आहे, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी सांगितले. विश्‍वस्त मंडळाने मंदिर उभारणीची नवीन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. तसेच मंदिराच्या कामाच्या प्रगतीची माहितीही घोषित केली आहे. मंदिराचे काम चालू असतांनाच भक्तांची गर्दी वाढत आहे. अनेक जण मंदिराचे काम पहाण्यासाठी येत आहेत.

गर्भगृहाच्या भिंतीची उभारणी

मंदिराच्या गर्भगृहाची भिंत उभारली जात आहे. त्यात आतापर्यंत सुमारे ७५ शिळा बसवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे मंदिराच्या व्यासपिठासाठी कर्नाटकातून आलेला  ग्रॅनाइट वापरण्यात आला आहे. मंदिराचा पाया अधिक भक्कम करण्यासाठी ३ दिशांना भिंती बांधण्यात आल्या आहेत. मंदिर पुढचे १ सहस्र वर्षे तरी टिकेल, याचा विचार करून पाया भक्कम बांधण्याकडे लक्ष दिले जात आहे. हा प्रकल्प ८ एकर भूमीवर साकारला जात आहे. मंदिर संकुलात मंदिराच्या बांधकामानंतर, प्रवासी सुविधा केंद्र, रामकथा मंडप, गोशाळा आणि मल्टी-थिएटर बांधण्याची योजना आहे.