साम्यवादी (कम्युनिस्ट) सरकारांनी सर्व ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचे विधान !

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात त्या म्हणत आहेत, ‘साम्यवादी (कम्युनिस्ट) सरकारांनी हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवले आहे.’ इंदू मल्होत्रा आणि आताचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी केरळममधील श्री पद्मनाभस्वामी मंदिराशी संबंधित एका आदेश दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे विधान केले होते. या व्हिडिओवरून साम्यवाद्यांनी, ‘त्यांच्याकडे प्रकरणे गेल्यावर त्या कशा पक्षपात करत असणार ?’, असे म्हणत टीका केली आहे; मात्र अनेकांनी इंदू मल्होत्रा यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

साम्यवादी सरकारे केवळ महसुलामुळेच मंदिरांवर नियंत्रण मिळवू इच्छित आहेत !

इंदू मल्होत्रा यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, या साम्यवादी सरकारांसमवेत असेच व्हायला हवे. हे लोक केवळ महसूल लाटू पहात आहेत. ते केवळ महसुलामुळेच मंदिरांवर नियंत्रण मिळवू इच्छित आहेत. त्यांनी सर्व ठिकाणी नियंत्रण मिळवले आहे. त्यातही केवळ हिंदूच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळेच न्यायमूर्ती लळीत आणि मी त्यांना असे करण्यापासून रोखले होते.

पद्मनाभस्वामी मंदिराशी संबंधित ऐतिहासिक निर्णय

इंदू मल्होत्रा ज्या निर्णयाविषयी सांगत आहेत, तो १३ जुलै २०२० मध्ये ‘श्री पद्मनाभस्वामी मंदिराचे प्रशासन आणि संपत्ती यांचा अधिकार’ यावरून दिला होता. यात न्यायालयाने श्री पद्मनाभस्वामी मंदिराच्या प्रशासनाचा अधिकार त्रावणकोर राजपरिवाराकडे कायम ठेवला होता.

कोण आहेत इंदू मल्होत्रा ?

इंदू मल्होत्रा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या  पहिल्या अधिवक्त्या आहेत. त्या केरळच्या शबरीमला मंदिराविषयीच्या निर्णयामध्ये एकमेव न्यायमूर्ती होत्या, ज्यांनी मंदिरामध्ये १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशाची अनुमती देण्याऐवजी धार्मिक परंपरांचे रक्षण करण्याचे समर्थन केले होते.