वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने निगडी (पुणे) येथील रहिवाशांचे ‘महावितरण’च्या कार्यालयात आंदोलन !

निगडी (पुणे) – येथील पेठ क्रमांक २२ येथे गेल्या पाच मासांपासून विद्युत् पुरवठा वारंवार खंडित होत आहे. ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांना सांगूनही ते दुर्लक्ष करत आहेत’, असा आरोप करत या भागातील रहिवाशांनी निगडी येथील महावितरणच्या कार्यालयात आंदोलन केले. (मूलभूत गोष्टींसाठी नागरिकांना आंदोलन करायला लावणारे संवेदनाशून्य प्रशासन ! – संपादक) ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ऑनलाईन काम करणारे या सर्वांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने खोळंबा होतो, अशी तक्रार नागरिकांनी केली. समस्या सुटली नाही, तर आणखी तीव्र आंदोलन करण्याची चेतावणी मनसेचे शहराध्यक्ष आणि या भागाचे माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी दिली आहे.