पुणे – ‘पुणे हँडमेड पेपर्स’, ‘आर्ट पुणे फाऊंडेशन’ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगवा तुमचा कागदी बाप्पा’ हा धर्मशास्त्रविरोधी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत रंगवण्यात येणार्या ‘इको-फ्रेंडली’ गणेशमूर्ती या ८० टक्के कापूस आणि कागद यांचा लगदा अन् २० टक्के शाडूमाती अशा मिश्रणापासून सिद्ध केल्या जातात. या उपक्रमाला ‘सह्याद्री इंडस्ट्रीज’, ‘सुहाना’ आणि ‘कॅम्लिन’ यांनी साहाय्य केले आहे.
कागदी मूर्ती ही पर्यावरणास घातक आहेत, हे संशोधनातून सिद्ध !पुरो(अधो)गाम्यांकडून ‘कागदाची मूर्ती म्हणजे ‘इको-फ्रेंडली’ मूर्ती’, असा दुष्प्रचार केला जातो. प्रत्यक्षात मात्र कागदी लगद्यापासून बनवलेली मूर्ती ही पर्यावरणाच्या प्रदूषणास साहाय्यकारी ठरते, हे संशोधन अंती सिद्ध झाले आहे. १. सांगली येथील पर्यावरण तज्ञ सुब्बाराव म्हणतात, ‘‘कागदी लगद्याच्या मूर्तीमुळे माशांच्या कल्ल्यात कागद अडकून ते मरतात. पाण्यातील प्राणवायू (ऑक्सिजन) अल्प होऊन पाण्यातील जलचर प्राणी आणि वनस्पती मरतात. तसेच पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते. त्यातून ‘मिथेन’ नावाचे घातक रसायन सिद्ध होते. २. रसायन तंत्रज्ञान संस्थेने (‘आयसीटी’ने) कागदी लगद्याच्या मूर्तींचे संशोधन केले आहे. त्यानुसार १० किलोची कागदी लगद्याची मूर्ती १ सहस्र लिटर पाणी प्रदूषित करते. |
संपादकीय भूमिकाचिकणमाती किंवा शाडूची माती यांव्यतिरिक्त अन्य वस्तूंपासून मूर्ती बनवणे, हे धर्मशास्त्रविरोधी आहे. त्यामुळे अशा हिंदु धर्मविरोधी उपक्रमांना सर्व गणेशभक्तांनी वैध मार्गाने विरोध करायला हवा ! |