१. भारत रशियाकडून ‘टीयू-१६०’ नावाचे ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ जेट खरेदी करण्याच्या सिद्धतेत !
नोव्हेंबर २०२१ मध्ये चीनने ‘एच्-६ के’ नावाचे ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ भारताच्या सीमेवर तैनात केले होते. त्या वेळी चीनच्या या शस्त्राचा सामना करण्यासाठी भारताकडे कोणताही उपाय नव्हता; परंतु आता चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारत रशियाकडून एक ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ खरेदी करत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता वाढणार आहे. यापूर्वी भारताने रशियाकडून ‘एस् ४००’ ही हवाई संरक्षणप्रणाली घेतली होती. त्यानंतर आता ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ची खरेदी करण्याची योजना आहे. ही भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. हे ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ केवळ अमेरिका, चीन आणि रशिया या देशांकडेच आहे. चीनचे बाँबर हे भारताच्या विरोधात काम करील, याविषयी शंका नाही. त्यामुळे भारताचे ‘टीयू-१६०’ हे ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ चीनला प्रत्युत्तर ठरेल.
२. ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’मुळे भारताला पाकिस्तान आणि चीन या देशांमधील कुठल्याही ठिकाणांवर शस्त्रांचा सहजतेने अन् काही क्षणांत मारा करता येणे
‘टीयू-१६०’ हे ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ हे अतिशय शक्तीशाली विमान समजण्यात येते. ते इतर ‘बाँबर’पेक्षाही अधिक प्रमाणात बाँब आणि क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकते. त्यातून बाँब आणि क्षेपणास्त्रे यांचाही मारा करता येतो. याचा वापर चीनचे मोठे हवाई तळ आणि मोठी धरणे आदी ठिकाणी करता येईल. त्यामध्ये अणूबाँबही घेऊन जाता येतात. हे ५० ते ६० सहस्र फूट उंचावरून उडते. त्यामुळे ते रडारच्या कक्षेत येत नाही. त्याचा वेग हा आवाजाच्या दुप्पट किंवा तिप्पट असतो. त्यामुळे त्याला थांबवणे तेवढे सोपे नसते. त्याचा पल्ला (रेंज) प्रचंड दूरपर्यंत असतो. ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ म्हणजे असे जेट्स असतात की, जे डोळ्यांची पापणी लवण्याच्या आतच शत्रूच्या क्षेत्रात बाँब किंवा क्षेपणास्त्र टाकून परत येऊ शकतात. कधीही आणि कुठेही आक्रमण करण्याची क्षमता हेच या ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’चे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे पाकिस्तान किंवा चीन यांच्या कुठल्याही लक्ष्यावर ते सहजपणे मारा करू शकतील.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
३. भारताकडे ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ नसल्याची कारणे आणि ते असण्याची अपरिहार्यता !
‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ हे पारंपरिक युद्धात वापरले जातात. ते भारताने खरेदी केलेले नव्हते; कारण आतापर्यंत त्यांची आवश्यकता नव्हती. भारताकडील विविध लढाऊ विमाने विविध लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहेत. भारताकडे असलेली अग्नी-१, अग्नी-२, अग्नी-३, अग्नी-४ ही क्षेपणास्त्रे चीनच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन मारा करू शकतात. चीनने ‘एच्-६ के’ नावाचे ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ भारताच्या सीमेवर तैनात केले होते. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडेही तसे बाँबर असायला हवे. भारताकडे असलेली विमाने ही तिबेटच्या मुख्य भूमीवर पोचू शकतात; परंतु चीनच्या मुख्य भूमीवर पोचण्याची भारताची क्षमता नाही. त्यावर केवळ अग्नी-४ आणि अग्नी-५ ही क्षेपणास्त्रेच पोचू शकतात. त्यामुळे भारताकडे असे बाँबर असले, तर चीनच्या कोणत्याही लक्ष्यावर मारा करता येऊ शकतो. त्यासाठी हे विमान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
४. चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘स्ट्रॅटेजिक बाँबर’ खरेदी करण्याचा योग्य निर्णय घेणे
देहलीत ‘चाणक्य फाऊंडेशन’ने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख अरूप साहा यांच्या भाषणात त्यांनी भारत रशियाकडून बाँबर खरेदी करत असल्याच्या योजनेचा संदर्भ दिला. या कराराविषयी भारत किंवा रशिया यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. अर्थात् या संदर्भातील वाटाघाटी चालू आहेत. त्या अंतिम टप्प्यात आहेत. वर्ष १९७० पासून रशिया ही विमाने वापरत आहे. त्यामुळे या विमानांची उपयुक्तता सिद्ध झाली आहे. हे विमान अतिशय चांगले असल्याचे सर्व जगाने मान्य केले आहे. त्यामुळे भारतालाही वाटले की, चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याकडे एक किंवा दोन बाँबर असायला हवीत. त्याप्रमाणे भारतीय वायूदलाने भारत सरकारला दिलेल्या प्रस्तावानुसार भारत आणि रशिया यांच्यात वाटाघाटी चालू आहेत. येणार्या काळात त्याला निश्चित यश मिळेल.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे