महिलेने लैंगिक वासना उद्दिपीत करणारे कपडे घातले असतील, तर लैंगिक छळाचा थेट आरोप करणे अयोग्य ! – केरळ उच्च न्यायालय

कोळीकोड (केरळ) – जर महिलेने लैंगिक वासना उद्दिपीत करणारी वेशभूषा केली असेल, तर लैंगिक छळाचे प्रावधान असणारे भा.द.वि. चे कलम ‘३५४ अ’ हे सकृतदर्शनी लागू पडत नाही, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. सिविक चंद्रन् नावाच्या ७४ वर्षीय समाजसेवकावर एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित घटना फेब्रुवारी २०२० मधील आहे.
आरोपी चंद्रन् यांनी जामीन मिळण्यासाठी केरळ उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता. यावर न्यायालयाने म्हटले की, आरोपीने न्यायालयासमोर जामिनाच्या अर्जासमवेत सादर केलेली छायाचित्रे पहाता संबंधित महिलेने लैंगिक वासना उद्दिपीत करणारे कपडे परिधान केल्याचे लक्षात येते. तसेच शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली ७४ वर्षीय व्यक्ती संबंधित महिलेचा बलपूर्वक लैंगिक छळ करत असेल, यावर विश्‍वास ठेवता येत नाही.