कर्नाटकातील भाजप सरकारच्या विज्ञापनांमध्ये नेहरूंच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र

काँग्रेसकडून टीका

बेंगळुरू (कर्नाटक) – केंद्रशासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कर्नाटकमधील भाजप सरकारने वृत्तपत्रांत प्रसिद्धीसाठी एक विज्ञापन दिले आहे. यात भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जागी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. याला काँग्रेसने विरोध केला आहे.

१. भाजपचे प्रदेश सरचिटणीस एन्. रविकुमार याविषयी म्हणाले की, नेहरूंनी कधीही म. गांधी यांचे ऐकले नाही. ते देशाच्या फाळणीला उत्तरदायी होते. त्यामुळे आम्ही त्यांचे छायाचित्र विज्ञापनात प्रसिद्ध करणार नाही.

२. काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस गांधी, नेहरू, पटेल आणि अन्य नेते याचा वारसा पुढे नेतांना देश एकजूट करण्याचा प्रयत्न करेल. द्वेषाच्या राजकारणाचा पराभव होईल.

भाजपने सादर केलेल्या व्हिडिओमध्ये नेहरूच फाळणीला उत्तरदायी असल्याचा उल्लेख !

केंद्रशासनाने गेल्या वर्षीपासून १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी विभीषिका स्मृती दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार यावर्षी राज्यातील भाजपने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ७ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये ‘फाळणीच्या वेळी पाकिस्तानच्या निर्मितीमागे नेहरूंचा हात होता; कारण महंमद अली जिना यांच्या ‘मुस्लिम लीग’ पक्षाच्या पाक निर्मितीच्या मागणीपुढे नेहरूंना माघार घ्यावी लागली होती’, असे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

भाजप सरकारने काय चुकीचे केले ? स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काँग्रेसने आतापर्यंत वाळीत टाकले त्याविषयी कॉग्रेसवाले का बोलत नाहीत ? आता जर सावरकर यांना कुणी न्याय देत असेल, तर ती राष्ट्राभिमान्यांसाठी अभिमानाचीच गोष्ट आहे !