घायाळ चिनी सैनिकांवर उपचार करणार्‍या भारतीय डॉक्टरची चीनने केली होती हत्या !

  • वर्ष २०२० मध्ये भारताच्या गलवान खोर्‍यात चीनच्या सैनिकांसमवेत झालेल्या संघर्षाचे प्रकरण

  • आगामी पुस्तकातून धक्कादायक खुलासा !

डॉ. दीपक सिंह (डावीकडे) त्यांची पत्नी रेखा सिंह त्यांचा ‘वीर चक्र’ पुरस्कार स्वीकार करताना (उजवीकडे)

नवी देहली – वर्ष २०२० मध्ये लडाखच्या गलवान खोर्‍यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांनी शौर्य गाजवून चीनच्या अनेक सैनिकांना ठार केले होते. त्या वेळी घायाळ झालेल्या भारतीय सैनिकांवर उपचार करणारे भारतीय सैन्यातील डॉ. दीपक सिंह यांनी अनेक चिनी सैनिकांवरही उपचार करून त्यांचा जीव वाचवला होता. तरीही चिनी सैन्याने त्यांचे अपहरण करून त्यांना ठार केले, असा धक्कादायक खुलासा ‘इंडियाज मोस्ट फियरलेस ३ : न्यू मिलिट्री स्टोरीज ऑफ अनइमॅजिनेबल करेज अँड सॅक्रीफाईस’ (भारताचे सर्वांत निडर ३ : अकल्पनीय धैर्य आणि बलीदान यांच्या संदर्भात सैन्याच्या नव्या कथा) या पुस्तकातून करण्यात आला आहे. शिव अरूर आणि राहुल सिंह या पत्रकारांनी लिहिलेले हे पुस्तक येत्या १५ ऑगस्ट या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी प्रकाशित करण्यात येणार आहे.

पुस्तकातील काही महत्त्वपूर्ण अंश !

१. १५ जून २०२० च्या रात्री दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या एका कर्नलसमवेत २० सैनिकांनी सर्वोच्च बलीदान दिले. चीनने म्हटले होते की, त्याचे केवळ ४ सैनिक मारले गेले; परंतु पुस्तकात दिलेल्या अनेक तथ्याधारित घटनांचा दाखला देऊन चीनचा खोटेपणा उघडा पाडण्यात आला आहे.

२. गलवान खोर्‍यात चीनने त्याच्या घायाळ सैनिकांना वार्‍यावर सोडून दिले होते. साधारण ३० हून अधिक घायाळ भारतीय सैनिकांवर उपचार करून त्यांचा जीव वाचवल्यावर डॉ. दीपक सिंह यांनी घायाळ चिनी सैनिकांवरही उपचार केले होते.

३. त्यानंतर चिनी सैन्याने डॉ. सिंह यांचे अपहरण करून त्यांच्या उर्वरित घायाळ सैनिकांवर उपचार करवून घेतले आणि त्यानंतर त्यांची हत्या केली.

४. २६ जानेवारी २०२१ या दिवशी डॉ. सिंह यांना मृत्यूत्तर दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार ‘वीर चक्र’ प्रदान करण्यात आला.

५. त्यांची पत्नी रेखा सिंह या भारतीय सैन्यात भरती झाल्या असून पुढील वर्षी ‘लेफ्टनंट’ म्हणून रुजू होणार आहेत. सध्या त्यांचे सैनिकी प्रशिक्षण चालू आहे.

संपादकीय भूमिका

पाशवी मनोवृत्ती आणि उपकार करणार्‍याचाच घात करणारा कृतघ्न चीन ! अशा चीनला आता सर्व स्तरांवर नामोहरम करण्यासाठी भारताने प्रयत्न करणे आवश्यक !