पोलीस हवालदाराच्या हत्येच्या प्रकरणी माजी खासदाराला २७ वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा

माजी खासदार उमाकांत यादव

शाहगंज (उत्तरप्रदेश) – येथील एका पोलीस हवालदाराच्या हत्येच्या २७ वर्ष जुन्या प्रकरणात बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार उमाकांत यादव यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. यादव यांच्यासह न्यायालयाने एकूण ७ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
४ फेब्रुवारी १९९५ या दिवशी शाहगंज रेल्वे स्थानकात उमाकांत यादव यांचा वाहनचालक राजकुमार यादव याने पोलीस कर्मचार्‍यांशी उद्धट वर्तन केले होते. यामुळे त्याला पोलीस हवालदारांनी रेल्वे स्थानकावरील पोलीस चौकीत बसवून ठेवले होते. चालकाला पोलीस चौकीत बसवून ठेवल्याचे कळताच उमाकांत यादव तेथे पोचले होते. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे सहकारीही होते. उमाकांत यादव आणि पोलीस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर शाहगंज रेल्वे स्थानकात झालेल्या गोळीबारात पोलीस हवालदार अजय सिंह याचा मृत्यू झाला, तर अन्य ३ जण घायाळ झाले होते.

संपादकीय भूमिका

विलंबाने मिळालेला न्याय, हा अन्यायच म्हणावा लागेल !