अल्पसंख्य हिंदु, ख्रिस्ती आणि शीख धर्मीय बंदीवानांनी त्यांचा धर्मग्रंथ पाठ केल्यास त्यांच्या शिक्षेत ३ ते ६ मासांची सूट मिळेल !

पाकिस्तानमधील पंजाब सरकारचा प्रस्ताव

प्रतीकात्मक छायाचित्र

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या पंजाबमधील नवीन सरकार राज्यातील कारागृहातील बंदीवानांपैकी हिंदु, ख्रिस्ती आणि शीख या अल्पसंख्य धर्मांतील बंदीवानांना एक प्रस्ताव देणार आहे. ‘जर त्यांनी त्यांच्या धर्माचा धर्मग्रंथ (श्रीमद्भगवद्गीता, बायबल आणि गुरुग्रंथ साहिब) पाठ केला, तर त्यांना त्यांच्या शिक्षेमध्ये ३ ते ६ मासांची सूट देण्यात येईल.’  पंजाब प्रांताच्या गृह विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले, ‘या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. मंत्रीमंडळाच्या संमतीनंतर ही योजना लागू करण्यात येणार आहे.’ सध्या पंजाब प्रांतातील ३४ कारागृहांमध्ये १ सहस्र १८८ अल्पसंख्य समाजातील बंदीवान शिक्षा भोगत आहेत.

१. मार्च मासात एका ख्रिस्ती बंदीवानाने लाहोर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून अल्पसंख्य समाजातील बंदीवानांना शिक्षेमध्ये सूट देण्याची मागणी केली होती. यात त्याने ‘पाकिस्तान कारागृह नियम १९७८’च्या नियम २१५ नुसार ‘मुसलमान बंदीवानांना शिक्षेत सूट देण्यात येते, तशी अल्पसंख्य धर्मांतील बंदीवानांनाही मिळावी’, असे म्हटले होते.

२. मुसलमान बंदीवानांना कुराण पाठ केल्यास ६ मांस ते २ वर्षांपर्यंत शिक्षेत सूट मिळण्याचाही प्रस्ताव आहे. या प्रस्तवाला मंत्रीमंडळाची अनुमती मिळणे आवश्यक आहे.

संपादकीय भूमिका

भारतात हिंदु बंदीवानांना साधना शिकवून त्यांच्याकडून धर्माचरण करून घेणे आवश्यक आहे ! असे केल्याने त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्तीमध्ये पालट होऊन त्यांच्यात सुधारणा होऊ शकते !