खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ !

खासदार संजय राऊत

मुंबई – पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची कोठडी ‘पी.एम्.एल्.ए.’ (आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत चालणार्‍या) न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यापूर्वीची त्यांना दिलेली ३ दिवसांची कोठडी संपल्यावर ४ ऑगस्ट या दिवशी त्यांना ‘पी.एम्.एल्.ए.’ न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्या वेळी न्यायालयाने राऊत यांची कोठडी वाढवली.

अंमलबजावणी संचालनालयाने न्यायालयात राऊत यांच्या कोठडीत १० ऑगस्टपर्यंत वाढ करण्याची मागणी केली होती. राऊत यांचे अधिवक्ता मनोज मोहिते यांनी संजय राऊत अन्वेषणाला सहकार्य करत असल्याचे न्यायालयात नमूद केले. संजय राऊत यांनी सुनावणीच्या वेळी ‘कोठडीमधील वातावरणामुळे श्वास घ्यायला त्रास होत आहे’, अशी तक्रार केली. या वेळी न्यायालयाने संजय राऊत यांना हवेशीर खोली देण्याचे निर्देश दिले. अंमलबजावणी संचालनालयाचे अधिवक्ता वेणेगावकर यांनी सांगितले, ‘‘संजय राऊत यांच्याविषयी काही संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. यानुसार आर्थिक अपहार झाला असल्याचे आढळून आले आहे. पत्राचाळ आर्थिक प्रकरणातील आरोपी प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात मोठी रक्कम पाठवण्यात आली आहे.’’

सौजन्य : NDTV

पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप !

पत्राचाळ घोटाळ्याच्या प्रकरणी संजय राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाकडून करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत यांच्या आस्थापनाकडून पत्राचाळमधील भूमी विकासासाठी घेतली आहे. प्रवीण राऊत यांनी ‘एच्.डी.आय्.एल्.’ ग्रूपकडून ११२ कोटी रुपये मिळाले. त्यातील १ कोटी ६ लाख ४४ सहस्र रुपये संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले आहेत. या रकमेतूनच रामनाथ (अलिबाग) येथील भूमी खरेदी करण्यात आली. अशा प्रकारे पत्राचाळ आर्थिक अपहारात संजय राऊत यांना थेट आर्थिक लाभ झाला. ‘प्रवीण राऊत यांना पुढे करून संजय राऊत हेच आर्थिक व्यवहार करत होते’, असा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे.