संपादकीय
गुन्हेगार विद्यार्थ्यांमधून उद्याचे अट्टल गुन्हेगार निर्माण होत असल्याने ते रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणे आवश्यक !
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील ५ प्रसिद्ध शाळांमधील २०० विद्यार्थ्यांनी ‘तांडव’, ‘माया’ आणि ‘अमर’ या नावांनी टोळ्या (‘गँग’) स्थापन केल्या आहेत. या टोळ्यांनी काही दिवसांपूर्वी देशी बाँबचे अनेक स्फोट घडवून आणले होते. या प्रकरणी पोलिसांनी १० अल्पवयीन विद्यार्थ्यांसह ११ जणांना कह्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अनेक दुचाकी, १२ भ्रमणभाषसंच आणि काही देशी बाँब जप्त करण्यात आले आहेत. हे विद्यार्थी परस्परांवर आक्रमणे करायचे आणि देशी बाँब फेकायचे, तसेच दुसर्या टोळ्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी बाँबस्फोटांची छायाचित्रेही पोस्ट करायचे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या टोळीचे सामाजिक संकेतस्थळावर वेगळे ‘पेज’ही बनवले आहे. हे सर्वच धक्कादायक आणि तितकेच चिंताजनकही आहे. ‘आजची मुले ही उद्याची भावी पिढी’ असे आपण म्हणतो; पण सध्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडणार्या अनेक घटना पहाता त्यांच्या माध्यमातून ‘भावी आणि उज्ज्वल पिढी निर्माण होऊ शकेल का ?’, असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. काही वर्षांपूर्वी गुरुग्राममधील ‘इंटरनॅशनल’ शाळेतील विद्यार्थ्यांची हत्या इयत्ता अकरावीतील विद्यार्थ्याने केली होती. अकोला येथे क्षुल्लक कारणावरून २ विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणीवर्गातील विद्यार्थ्याला पुष्कळ मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्यावर मारहाण आणि खंडणी याचे गुन्हे नोंद झाले होते. एका मोठ्या शहरातील विद्यार्थ्यांनी मध्यंतरी ‘व्हॉट्सॲप’चा गट बनवून त्यावर ‘कोणत्या विद्यार्थिनीवर बलात्कार करायचा’, याविषयी चर्चा केल्याचे उघडकीस आले होते. दुसर्या घटनेत शाळेतल्या मित्रांनी ४० वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिचा ‘व्हिडिओ’ शाळेतील मित्रांच्या ‘व्हॉट्सॲप’ गटात टाकला होता. हे सर्व प्रकार पहाता ‘विद्यार्थ्यांच्या बालमनात इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा, अश्लीलता, उन्माद आणि उर्मटपणा यांचा शिरकाव नेमका होतो तरी कसा ?’, असा प्रश्न पडतो. नैतिकता, धार्मिकता यांचा कुठेही लवलेश नसलेले, तसेच सामाजिक भान न जोपासणारे असे विद्यार्थी उद्या कोणत्या बळावर आपला देश चालवणार आहेत ?
पालक आणि चित्रपटसृष्टी यांचे दायित्व !
विद्यार्थी मन खरेतर संस्कारक्षम हवे; पण आज दुर्दैवाने ते गुन्हेगारी मानसिकतेने ग्रासले जात आहे. यात मुख्य दायित्व आहे ते पालकांचे ! सध्या विभक्त कुटुंबपद्धत अस्तित्वात असल्याने आणि आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे मूल घरात बराच काळ एकटेच असते. त्यामुळे त्यांना आई-वडिलांविषयी जवळीक तरी कशी वाटणार ? यातून निर्माण झालेल्या हट्टी, निगरगट्ट आणि उदासीन मानसिकतेमुळे त्यांच्याकडून गुन्हेगारी विश्वाकडे वळण्याचे धोकादायक पाऊल उचलले जाते. आई-वडिलांना तर याचा थांगपत्ताही नसतो. चोरी करून एखादी वस्तू मिळवण्यापर्यंत असलेली मजल कालांतराने भ्रष्टाचार, बलात्कार आणि मग देशविघातक कृत्ये करणे इथपर्यंत गेलेली असते. गुन्हेगारी विश्वाकडे वळणारे पाऊल वेळीच रोखणे, हे सर्वस्वी पालकांच्या हातात आहे.
चित्रपटांतील हिंसक दृश्यांचा प्रभाव पडून विद्यार्थ्यांकडून अशा टोळ्यांची निर्मिती होते. त्यामुळे ‘मर्डर’ (खून), ‘गँगस्टर’ (टोळीप्रमुख), ‘शूटआऊट’ (गोळीबार) हे शब्द विद्यार्थ्यांच्या तोंडी सर्रास येतात. हिंसक चित्रपट पाहून बोलणार्या ५ वर्षीय मुलीचा एक ‘व्हिडिओ’ सामाजिक संकेतस्थळांवर नुकताच प्रसारित झाला. गुंड ज्या पद्धतीने शिवीगाळ किंवा अरेरावी करत बोलतात, त्याप्रमाणे गुंडांची भाषा वापरून ती मुलगी तिच्या आईशी बोलत होती, तिला धमकावत होती. खरे पहाता ५ वर्षांची मुलगी म्हणजे निरागसता, कोवळे मन आणि बालीशपणा यांचे मिश्रण ! खेदाची गोष्ट म्हणजे ही निरागसता सध्या लोप पावत असून तिची जागा हिंसा, मारकता आणि क्रूरता यांनी घेतली आहे.
देशाला कलंक !
जे प्रयागराजमध्ये घडले किंवा घडत आहे, ते देशात अन्य ठिकाणी घडत नसेल कशावरून ? पौंगडावस्थेत असणार्या विद्यार्थ्यांची हीच मानसिकता देशाला गुन्हेगारीकडे नेण्यात प्रमाणभूत ठरत आहे. ‘आजच्या गुन्हेगार विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे आतंकवादी आपण निर्माण करत आहोत’, याचे भान सर्वांनीच ठेवायला हवे. ‘विद्यार्थी कसा घडत आहे ?’, याचे दायित्व शिक्षकांचेही आहे. २०० विद्यार्थी स्वतःच्या ‘टोळ्या’ निर्माण करतात, हे शिक्षकांच्या लक्षात कसे आले नाही ? ५ प्रसिद्ध शाळांमध्ये असा प्रकार घडणे हे शाळा प्रशासनाला लज्जास्पदच आहे. अशा शाळा ‘गुन्हेगार निर्मितीचे केंद्र’ म्हणून नावारूपाला आल्यास त्याला उत्तरदायी कोण ? शाळा प्रशासन, शिक्षण विभाग आणि सरकार अशा सर्वांनीच मिळून विद्यार्थ्यांच्या या टोळ्यांचा योग्य तो बंदोबस्त करायला हवा. शाळेत अध्ययनासाठी नव्हे, तर बाँबस्फोट घडवण्यासाठी येणारे विद्यार्थी हे देशाला कलंकच ठरतील ! देश पारतंत्र्यात असतांना स्वत:च्या प्राणांची चिंता न करता देशासाठी बलीदान देणारे, विविध खस्ता खाणारे, तसेच प्रतिकूल परिस्थितीचा आनंदाने सामना करणारे क्रांतीकारक आपले आदर्श आहेत. त्यामुळे अशांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर असायला हवा. तसे झाल्यासच आजचे विद्यार्थी देशाचे खर्या अर्थाने आदर्श नागरिक होतील. कायदे, तरतुदी, उपाययोजना, तसेच समुपदेशन या मार्गांनुसार कृती करायलाच हवी; पण याच्या जोडीला विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करणे, त्यांना धर्मशिक्षण देणे, त्यांच्याकडून धर्माचरण करवून घेणे, त्यांना धार्मिकतेची गोडी लावणे या कृतीही करणे अत्यावश्यक आहे. यातूनच नैतिकता आणि धर्मप्रेम यांचा भक्कम पाया निर्माण होईल. या बळावर वृद्धींगत होणारी भावी पिढी गुन्हेगारीकडे वळण्याची सुतराम शक्यता नाही. ‘बाल गुन्हेगारीमुक्त भारत’ ही संकल्पना केवळ अन् केवळ हिंदु राष्ट्रातच साध्य होऊ शकते. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्नरत रहाणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे, हे सर्वांनी जाणावे !