तमिळनाडूतील मंदिरातून वर्ष १९२९ मध्ये चोरीला गेलेली देवीची मूर्ती अमेरिकेत सापडली !

मूर्ती भारतात आणण्याचे प्रयत्न चालू !

राणी सेंबियन महादेवीची पितळेची मूर्ती

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील नागापट्टिनम् येथील मंदिरातून वर्ष  १९२९ मध्ये राणी सेंबियन महादेवीची पितळेची मूर्ती चोरीला गेली होती. ही मूर्ती अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील ‘फ्रीअर गॅलरी ऑफ आर्ट’ संग्रहालयात सापडली आहे. पोलिसांनी ती परत आणण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.

१. पोलिसांनी सांगितले की, वर्ष २०१८ मध्ये राजेंद्रन् नावाच्या व्यक्तीने ‘फ्रीअर गॅलरी ऑफ आर्ट’ला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी सेंबियन महादेवीची मूर्ती पाहिली होती. भारतात परतल्यानंतर त्यांनी याविषयी वेलंकन्नी पोलिसांना, तसेच सेंबियन महादेवी गावातील भाविकांनाही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले.

२. पोलिसांनी सांगितले की, न्यूयॉर्कमधील ‘फ्रीअर गॅलरी ऑफ आर्ट’ने वर्ष १९२९ मध्ये हॅगोप केव्होर्कियन नावाच्या व्यक्तीकडून ही मूर्ती विकत घेतली होती.

३. ‘राणी सेंबियन महादेवी ही त्या काळी राज्यातील सर्वांत शक्तिशाली राण्यांपैकी एक होती’, असे सांगितले जाते. पतीच्या निधनानंतर देवीने तिच जीवन मंदिरांच्या उभारणीसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. देवीने त्या काळी अनेक मंदिरे बांधली. ‘युनेस्को करारां’तर्गत सेंबियन महादेवीची मूर्ती परत आणली जाणार आहे.