लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

 

नवी देहली – लोकसभेत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि भाजपच्या  नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आमने-सामने आल्याने जोरदार खडाजंगी झाली. यावेळी राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर महिला खासदार यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ संबोधल्याने वाद झाला.

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली. गोंधळ चालू असतांना सोनिया गांधी भाजपच्या नेत्या रमादेवी यांच्याजवळ गेल्या आणि ‘अधीर रंजन चौधरी यांनी क्षमा मागितली आहे’, असे सांगितले. सोनिया गांधी आणि रमादेवी यांच्यात संभाषण चालू असतांना स्मृती इराणी यांनी हस्तक्षेप केला. त्यावर सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार वाद झाला. भाजपाच्या महिला खासदार काँग्रेसच्या अध्यक्षांच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे.