ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस ५ दिवसांच्या ‘प्रायश्चित्त तीर्थयात्रे’साठी कॅनडामध्ये पोचले आहेत. ‘कॅनडातील निवासी शाळांतून ख्रिस्ती मिशनर्यांनी बालकांशी केलेल्या दुर्व्यवहारासाठी पोप फ्रान्सिस मूलनिवासी समुदायाची क्षमा (माफी) मागू शकतात’, असे म्हटले जात आहे. याकडे मूलनिवासी समुदायाशी सामंजस्य प्रस्थापित करणे आणि तत्कालीन दुःखातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करणे या प्रयत्नांतील कॅथॉलिक चर्चचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे; मात्र पोप फ्रान्सिस यांच्या केवळ माफीनाम्याने मूलनिवासी समुदाय आणि त्यांची बालके यांच्यावर ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेल्या अत्याचारांचे प्रकरण दाबले जाईल, असे नाही; कारण त्यांनी केलेली कुकृत्ये क्षमा करण्याच्याही पलीकडची आणि मूलनिवासी समुदायाची संस्कृती चिरडणारी आहेत.
१. कॅनडामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांनी बालकांसाठी निवासी शाळा उभारणे आणि त्यांचे ख्रिस्तीकरण करण्यासाठी अत्याचार करणे
वर्ष १८०० ते १९९० या कालावधीत ख्रिस्ती मिशनर्यांकडून संपूर्ण कॅनडामध्ये कॅथॉलिक चर्चच्या १३९ निवासी शाळांमध्ये ‘मूलनिवासी’, ‘मेटिस’ (अमेरिकेच्या महाद्विपावरील मूलनिवासी म्हणजे ब्रिटन आणि फ्रान्स येथील पुरुष-आदिवासी महिला यांच्यापासून जन्मलेले मिश्र जातीच्या लोकांचे वंशज) आणि ‘इनुईट’ (उत्तर कॅनडामध्ये बर्फाळ प्रदेशात रहाणारा समुदाय) समुदायाच्या दीड लाख बालकांना भरती करण्यात आले होते. त्यामागचा उद्देश या बालकांच्या मनामध्ये कॅथॉलिक रितीरिवाजाची पेरणी करण्याचा होता. हिंदूंसह जगभरातील मूलनिवासी समुदायांमध्ये लहान बालकांना देवाघरची फुले मानले जाते; कारण त्यांचे मन अगदी निरागस असते. त्यांच्या मनात आपला-परका, स्वजातीचा-परक्या जातीचा, स्वधर्माचा-परक्या धर्माचा असा कोणताही विचार नसतो. ख्रिस्ती मिशनर्यांना मात्र ते मान्य नव्हते. या बालकांकडे ‘धर्मांतराच्या उद्योगाचा कच्चा माल म्हणूनच पहाणार’, या मानसिकतेने ख्रिस्ती मिशनर्यांनी त्यांना कह्यात घेतले. त्यासाठी निवासी शाळांची उभारणी केली आणि त्या माध्यमातून त्या बालकांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून शेकडो मैल दूर नेण्याचे प्रकार केले गेले.
त्यांना त्यांच्या मातृभाषेतून बोलायलाही बंदी घातली गेली. त्या बालकांच्या मनात ख्रिस्तत्व भिनवले. यामुळे ‘ते मोठेपणी पक्के ख्रिस्तानुयायी होतील आणि त्यांच्या पुढच्या पिढ्याही ख्रिस्ती म्हणूनच जन्माला येतील, जेणेकरून ख्रिस्त्यांची लोकसंख्याही वारेमाप वाढत राहील. या माध्यमातून जगावर ख्रिस्ती पंथाचे वर्चस्व निर्माण होईल’, असे हेतू ख्रिस्ती मिशनर्यांच्या या उद्योगामागे होते. त्यातूनच आदेश न मानणार्या, ख्रिस्ती पंथ न स्वीकारणार्या बालकांवर ख्रिस्ती मिशनर्यांनी अमाप अत्याचार केले. त्या अत्याचारांमुळे दीड लाख बालकांपैकी अनुमाने ६ सहस्र बालकांचा जीव गेला. त्यामुळेच आता पोप फ्रान्सिस क्षमा मागायला आले असले, तरी ‘शाळेतून घरी न आलेली आमची बालके नेमकी गेली कुठे ?’, या प्रश्नाचे उत्तरही मूलनिवासी समुदायाला पोप फ्रान्सिस यांच्याकडून हवे आहे.
२. ख्रिस्ती न होणार्यांचा ख्रिस्त्यांनी जगभर अतिशय क्रौर्यतेने छळ करणे
खरेतर पोप फ्रान्सिस क्षमा मागण्यासाठी केवळ कॅनडातच का गेले ? कारण ख्रिस्ती मिशनर्यांनी केवळ त्याच देशात मूलनिवासी समुदायावर अत्याचार केले, असे नाही, तर जगभरात ख्रिस्ती पंथाचा जिथे जिथे प्रसार झाला, तिथे तिथे तो मूलनिवासी समुदायावर अत्याचार करण्यातूनच झाला. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील देश येथे ख्रिस्ती पंथ पसरला, तो तेथील मूलनिवासींना धर्मांतरित करण्यातूनच ! कॅनडातील मूलनिवासी प्रथमपासून निसर्गपूजक, अग्निपूजक वा मूर्तीपूजक होते; पण ख्रिस्ती मिशनर्यांनी त्या सर्वांच्याच पूजापद्धतीवर आक्रमण करत त्यांना ख्रिस्ती करवून घेतले. ज्यांनी ख्रिस्ती व्हायला नकार दिला, त्यांचा अतिशय क्रौर्यतेने छळ केला, त्यांना नरकयातना दिल्या.
३. गोव्यात फ्रान्सिस झेवियरने ‘इन्क्विझिशन’च्या (धर्मच्छळाच्या) माध्यमातून हिंदूंवर अत्याचार करणे
तसेच जे ख्रिस्ती झाले, त्यांच्यावरही अत्याचार करणे, चर्चमधील नन्सवर बलात्कार करणे आदी अनेक उदाहरणे आहेत. पोप फ्रान्सिस त्यांचीही क्षमा मागतील का ? सोबतच भारतातही ख्रिस्ती मिशनर्यांनी गोव्यात हिंदूंच्या धर्मांतरासाठी नको ते सर्व प्रकार केले. फ्रान्सिस झेवियर ६ मे १५४२ या दिवशी गोव्यात आला तोच मुळी भारताच्या मातीतून मूर्तीपूजकांना उपटून टाकून ख्रिस्ती पंथ वाढवण्याच्या दृष्ट हेतूने ! त्याच्याच मार्गदर्शनाखाली बळजोरीने वा फसवून धर्मांतर करणे, हिंदु मंदिरे आणि मूर्ती यांची तोडफोड करणे, अशा योजना हाती घेण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर ख्रिस्ती पंथ न स्वीकारणार्या हिंदूंचे कान कापणे, त्यांचे हात-पाय तोडणे, स्त्रियांचे स्तन कापणे, अशा प्रकारे क्रौर्याची परिसीमा गाठत केवळ हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती मिशनरी गोव्यात राबू लागले. आजही गोव्यात ‘इन्क्विझिशन’ची (धर्मच्छळाची) साक्ष देत आहेच. त्यामुळे पोप फ्रान्सिस कॅनडाच्या व्यतिरिक्त अन्य देशांत ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेले अत्याचार आणि गोव्यातील इन्क्विझिशन यांसाठी क्षमा मागतील का ?
४. हिंदूंना धर्मांतरित करण्यासाठी ख्रिस्त्यांनी आमिषे दाखवून फसवणे
आताच्या घडीला ख्रिस्ती मिशनरी हिंदू वा अन्य धर्मिय यांच्या धर्मांतरासाठी निराळा मार्ग वापरतांना दिसतात. ‘आमचा येशू शक्तीशाली असून तुमचे सर्व दुःख दूर करण्याचे सामर्थ्य केवळ त्याच्याकडेच आहे. तुम्ही केवळ येशूला शरण येण्याचा अवकाश की, तुमच्या सर्व यातना दूर गेल्याच म्हणून समजा’, अशा प्रकारे ख्रिस्ती मिशनरी भोळ्याभाबड्या जनतेला त्यांच्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार करत आहेत.
मुंबईसह उल्हासनगरपासून ते पूर्वोत्तर राज्ये, पंजाब, केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून ‘चंगाई सभां’चे (‘चंगाई’ म्हणजे पाद्र्यांकडून आजारी असणार्यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे) आयोजन केले जात आहे. त्यात ‘येशू सर्व प्रकारचे आजार बरे करतो’, ‘कुणाची आर्थिक स्थिती दुबळी असेल, तर ती सुधारतो’, ‘घरातील संबंध ठीक नसतील, तर ते व्यवस्थित होतात’, अशी वेगवेगळी आमिषे दाखवली जातात. ख्रिस्ती मिशनर्यांचा दावा खरा असेल, तर अजूनही ख्रिस्तीबहुल अमेरिका, युरोप आदी देशांत गरिबी का आहे ? तिथेही ‘कोरोना’ असो वा ‘मंकीपॉक्स’ वा अन्य कोणते आजार का उद्भवतात ? पोप फ्रान्सिस हेही ‘व्हीलचेअर’वर (चाकाच्या आसंदीवर) बसून का फिरतात ? असे प्रश्न कुणी विचारत नाही; कारण ‘चंगाई सभां’ना येणार्या लोकांची पुरती दिशाभूल केली जाते, त्यांना संभ्रमात पाडले जाते, लालूच दाखवली जाते.त्यामुळेच भारतातही ठिकठिकाणी ख्रिस्त्यांची संख्या वाढत आहे.
५. केवळ क्षमायाचना न करता धर्मांतरितांना स्वधर्मात परत पाठवावे !
पोप फ्रान्सिस क्षमा मागायला आलेच, तर इतकी कुकृत्ये एकट्या भारतात ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेली आहेत की, ती संपणार नाहीत. त्यामुळे पोप फ्रान्सिस यांनी केवळ कॅनडात न जाता भारतातही येऊन क्षमा मागावी आणि ज्यांचे ख्रिस्ती मिशनर्यांनी बळजोरीने धर्मांतरित केले, त्यांनाही त्यांच्या मूळ धर्मात (हिंदु धर्मात) परत पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून पोप फ्रान्सिस यांचा प्रामाणिकपणा पहायला मिळेल, तोंडदेखल्या क्षमायाचनेने काहीही होणार नाही. मग तो भारत असो वा कॅनडा !
(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’)