काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांच्याकडून १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, भाजपचे नेते

अस्लम शेख

मुंबई – काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला.

‘याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांनी या प्रकरणी लवकरच चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले आहे’, असेही सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या पुढे म्हणाले की,

१. २ वर्षांत काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी मढ या भागात २८ ‘फिल्म स्टुडिओं’चे व्यावसायिक बांधकाम चालू केले आहे. यांतील ५ स्टुडिओ हे ‘किनारा नियमन क्षेत्रा’च्या (सी.आर्.झेड) क्षेत्रामध्ये आहेत. वर्ष २०१९ मध्ये ही जागा हिरवीगार होती; मात्र २०२१ मध्ये ती सी.आर्.झेड.मध्ये नाही, असे पर्यटन विकास मंडळाने म्हटले आहे. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर असल्याचे दाखवण्यात आले आहे; मात्र खारफुटीची झाडे तोडून स्टुडिओ उभारण्यात आले आहेत.

२. पर्यावरण मंत्रालयाने केवळ चित्रपटाचा ‘सेट’ उभारण्याची अनुमती दिली होती; मात्र अस्लम शेख यांच्या पाठिंब्यामुळे तेथे १० लाख चौरस फूट जागा मोकळी करून २८ स्टुडिओ बांधण्यात आले आहेत.

३. शिंदे सरकार आल्यानंतर या संदर्भातील काही कागदपत्रे मिळाली, ती आधी मिळत नव्हती; कारण आधीचे सरकार घोटाळेबाजांना वाचवण्याचे काम करत होते.