मुंबईमधील २३६ प्रभागांसाठी २९ जुलै या दिवशी आरक्षण सोडत !

निवडणुका

मुंबई – महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत २९ जुलै या दिवशी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृह येथे काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या सोडतीमध्ये इतर मागासवर्गासाठी ६३ प्रभागांतील आरक्षण आणि महिला आरक्षण घोषित होणार आहे. या आरक्षणावर २ ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत.

महाराष्ट्रात इतर मागासवर्गियांच्या आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. त्यामुळे आता नव्याने प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात इतर मागासवर्गियांसाठी २७ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण २३६ जागांपैकी इतर मागासवर्गासाठी ६३ जागा आरक्षित होणार आहेत. यांपैकी ३२ जागा इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित होणार आहेत, तर १५५ जागा खुल्या गटासाठी आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींचे आरक्षण लोकसंख्येच्या आधारे असल्यामुळे ३१ मे या दिवशी काढलेल्या सोडतीप्रमाणेच ते कायम राहील; मात्र ३१ मे या दिवशी महिलांच्या निश्चित केलेल्या आरक्षित जागा रहित करण्यात आल्या आहेत.