पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून चिनी लढाऊ विमानांचे उड्डाण !

प्रत्युत्तरासाठी भारताकडून ‘मिग-२९’ आणि ‘मिराज २००’ यांसारखी लढाऊ विमाने तैनात !

चिनी लढाऊ विमाने

लडाख – गेल्या तीन ते चार आठवड्यांपासून चीनची लढाऊ विमाने पूर्व लडाखमध्ये भारतीय सैन्याला चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळून चिनी विमाने उड्डाण करत आहेत. भारतीय हवाई दलही चीनच्या या खेळीला चोख प्रत्युत्तर देत आहे. भारतीय हवाई दलाने ‘मिग-२९’ आणि ‘मिराज २०००’ यांच्यासह सर्वांत शक्तिशाली लढाऊ विमाने तळांवर तैनात केली आहेत. चीनने भारताची हानी करण्याचा प्रयत्न केला, तर ही लढाऊ विमाने काही क्षणांत चीनच्या कारवायांना प्रत्युत्तर देऊ शकतात.

सौजन्य : India Today

लडाख सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीवरून चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ तणावात असल्याचे दिसते. या पायाभूत सुविधांमुळे भारतीय हवाई दलाला चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे याच मासात १७ जुलै या दिवशी दोन्ही देशांची ‘कॉर्प्स कमांडर चर्चा’ झाली होती. यानंतरही चीनने त्याच्या कारवाया चालूच ठेवल्या आहेत.

संपादकीय भूमिका

चिनी ड्रॅगनच्या अशा कुरापतींना ठोस प्रत्युत्तर देण्यासमवेतच ‘तो कुरापती काढणारच नाही’, अशी कणखर भूमिका भारताने घ्यावी, ही अपेक्षा !