कॅनडातील कॅथॉलिक चर्चच्या शाळांमधील मुलांवर झालेल्या अत्याचारांविषयी पोप फ्रान्सिस क्षमा मागणार !

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस

रोम (इटली) – कॅनडातील कॅथॉलिक चर्चच्या निवासी शाळांमधील मुलांवर झालेल्या अत्याचारांविषयी ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस जाहीर क्षमा मागणार आहेत. यासाठी पोप प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देणार आहेत. यासाठी ते कॅनडामध्ये पोचले आहेत. ते आठवडाभार कॅनडाच्या दौर्‍यावर असणार आहेत. कॅथॉलिक चर्चमध्ये मुलांवर अत्याचाराच्या घटना घडल्याचे गेल्या वर्षी समोर आले होते.

पोप कॅनडातील स्थानिक ख्रिस्ती गटांना भेटी देतील आणि देशातील निवासी शाळांमधील होत असलेल्या गैरवापरांविषयी भाष्य करतील. अनेक दशकांपासून स्थानिक मुलांवर अशा प्रकारे केलेल्या अत्याचारांसाठी स्थानिक नेत्यांनी पोप यांची यापूर्वीच क्षमा मागितली आहे.

कॅनडात काय घडले होते ?

गेल्या वर्षी कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया आणि सस्कॅचेवान येथील कॅथॉलिक  निवासी शाळांच्या मैदानावर शेकडो कबरी सापडल्या होत्या. त्या काही दशकांपूर्वीच्या होत्या. कॅनडातील सत्य आणि सामंजस्य आयोगाने याविषयीच्या नोंदी केल्या होत्या. यामध्ये ४ सहस्रांहून अधिक स्थानिक मुले निवासी शाळांमध्ये दुर्लक्षित राहिल्यामुळे आणि अत्याचारांमुळे मरण पावली होती.

संपादकीय भूमिका

पोप फ्रान्सिस किती आणि कुठे कुठे जाऊन क्षमा मागून पाद्री आणि चर्च यांच्या कुकृत्यांना पाठीशी घालणार आहेत ? ज्यांच्याकडून अत्याचार केले जातात, त्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्याची व्यवस्था चर्चकडून का केली जात नाही ? असे केले, तर अशा कुकृत्यांना पायबंद बसेल !