कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवावर घातलेले निर्बंध राज्यशासनाने हटवले !

यंदा सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – कोरोना महामारीच्या काळातील निर्बंधांमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या; पण आता सण साजरे करण्यावरील निर्बंध मागे हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. श्री गणेशमूर्तींच्या उंचीची मर्यादाही हटवण्यात आल्याची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी आणि मोहरम या सणांच्या कालावधीत राज्यातील कायदा-सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी २१ जुलै या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी अन् संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले

१. गणेशोत्सव साजरा करतांना श्री गणेशमूर्ती आगमनाच्या रस्त्यांवरचे सर्व खड्डे बुजवण्यात येणार आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या नोंदणीसाठी ‘एक खिडकी’ योजना राबवण्यात येणार आहे.

२. गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करतांना काही नियमावलीचे पालन करावे लागेल. मुंबईतील नियमावली संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहे.

३. सणांच्या काळात ज्यांच्यावर काही छोटे-मोठे गुन्हे नोंदवण्यात आले होते, ध्वनीप्रदूषणासंबंधी ज्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले होते, त्यांचा अभ्यास करून शक्य ते गुन्हे मागे घेण्यात येतील.

४. गणेशोत्सवाच्या काळात अधिक गाड्या सोडण्याचा आदेश राज्य परिवहन महामंडळाला देण्यात आला आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतुकीची कोंडी होऊ नये, याविषयी महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आली आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या वाहनांना पथकरमुक्ती !

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा उत्सव आहे. त्यानिमित्त लोक स्वत:च्या घरी जातात. अशांच्या सोयीसाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांच्या वाहनांना पथकरमुक्त करण्यात येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण २१४ विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीविषयी निर्णयासाठी समिती नेमणार !

‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीविषयी निर्णय घेण्यासाठी एक तांत्रिक समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय तंत्रज्ञान संस्था, ‘एन्.सी.एल्.’, ‘निरी’ आदी संस्थांच्या तज्ञांचा समावेश असेल. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल’, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.