ज्ञानवापीमधील शिवलिंगाची पूजा करण्याच्या मागणीवरील याचिकेवर सध्या सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

नवी देहली – ज्ञानवापी परिसरात सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची अनुमती मागणारी आणि त्याची ‘कार्बन डेटिंग’ (एखादी वस्तू किती वर्षे जुनी आहे, हे तपासणे ) चाचणी करण्याची मागणी करणार्‍या नवीन याचिकेवर सध्या सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.

१. न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाचा एक खटला वाराणसी जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे. वाराणसी न्यायालयातील खटल्याच्या निकालाची आम्ही वाट पहात आहोत. याची सुनावणी झाल्यावर पुढील सुनावणी करता येऊ शकते. तोपर्यंत हे प्रकरण प्रलंबित ठेवू. जर तेथे तुमच्या बाजूने निकाल लागला, तर प्रकरण समाप्त होते, जर विरोधात गेला, तर पुढे सुनावणी करता येऊ शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात यावर सुनावणी होऊ शकते.

२. सर्वोच्च न्यायालयाने या वेळी याचिकाकर्त्यांचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांना सांगितले की, तुम्ही समजूतदार अधिवक्ता आहेत. तुम्ही जी याचिका करून मागणी करत आहात, ती मालकी अधिकाराच्या संदर्भातील सुनावणीच्या वेळी करू शकता. तुम्ही कलम ३२ नुसार ही मागणी करू शकत नाही.