तापमान वाढीमुळे जगातील निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर ! – संयुक्त राष्ट्रांची चेतावणी

न्यूयॉर्क (अमेरिका) – जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जगात संकट निर्माण झाले आहे. युरोप खंड, तसेच अमेरिका, चीनसारखे अनेक देश भीषण उष्णतेमुळे त्रासलेले आहेत. फ्रान्स, स्पेन, पोर्तुगालसह १० देशांतील जंगलांना लागलेल्या आगींमुळे उष्णतेची तीव्रता भयंकर वाढवली आहे. ब्रिटनचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी लागू केली आहे. जंगलांच्या आगीमुळे सर्वत्र उष्णतेने कहर केला असून यात घुसमटलेली निम्मी लोकसंख्या सामूहिक आत्महत्येच्या मार्गावर आहे, अशी गंभीर चेतावणी संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे.

गेल्या ४६ वर्षांत भयानक वेगाने वाढलेल्या उष्णतेच्या दाहकतेमध्ये जगाची होरपळ चालू झाली आहे. वाढत्या उष्णतेला जंगलातील वणवा, हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. स्पेनमध्ये ३६ ठिकाणी वणवे भडकले आहेत. यात २२ सहस्र हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील वनसंपदा भस्मसात झाली आहे. परिणामी दक्षिण-पश्‍चिम स्पेनमध्ये तापमानाने ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे उसळी घेतली आहे. उष्माघातामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडत आहेत.

संपादकीय भूमिका

प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास केल्याचाच हा परिणाम आहे. निसर्गावर आघात केल्यावर निसर्ग त्याचे परिणाम दाखवून देतो, हे मनुष्याला लक्षात येईल आणि निसर्गाला अनुकूल असे वर्तन करील, तो सुदिन होय !