हिंदु असणे ही शरमेची गोष्ट आहे का ?

‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांचा परखड प्रश्‍न !

‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

नवी देहली – मी हिंदु आहे आणि मी तेे सांगण्याची मला कोणतीही लाज वाटत नाही. हिंदु असणे ही शरमेची गोष्ट आहे का ?, असा प्रश्‍न भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (‘इस्रो’चे) माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी एका मुलाखतीत विचारला आहे. त्याविषयीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. नंबी नारायणन् यांंच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात त्यांना पूजापाठ करतांना दाखवण्यात आले आहे. त्यावरून चित्रपट समीक्षकांनी टीका केली आहे. याविषयी नंबी नारायणन् यांना विचारले असता त्यांनी वरील उत्तर दिले. ‘मी हिंदु असल्याने चित्रपटात मला हिंदु दाखवण्यात आले आहे. मला मुसलमान किंवा ख्रिस्ती दाखवता येऊ शकत नाही’, असेही त्यांनी या वेळी म्हटले.

ब्राह्मण असणे पाप आहे का ?

‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाचे समीक्षण करणारे काही चित्रपट समीक्षक ‘नारयणन् ब्राह्मण आहेत’, असे म्हणत आहेत. त्यावर नंबी नारायणन् म्हणाले की, मी ब्राह्मण नाही आणि जरी असतो, तरी त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? तुम्ही त्यांना मारणार आहात का ? ब्राह्मण असणे पाप आहे का ? जर तुमचा सहकारी ब्राह्मण असेल, तर तुम्ही त्याला हीन समजणार का ? असे कितीतरी ब्राह्मण आहेत ज्यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. याची तुम्हाला मी सूचीच देऊ शकतो. विनाकारण अशा गोष्टींना महत्त्व दिले जात आहे.

मला तुम्ही साम्यवादी म्हणणार आहात का ?

नंबी नारायणन् पुढे म्हणाले, ‘‘मला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन् या दोघांकडून समर्थन मिळाले आहे; मग मला तुम्ही साम्यवादी समजणार आहात का ? मोदी यांना पंतप्रधानाऐवजी ‘भाजपची व्यक्ती’ म्हणूनच पाहिले जाते. लोकांच्या मनावर हे बिंबवण्यात आले आहे.’’

संपादकीय भूमिका

भारतात एका हिंदु व्यक्तीला असा प्रश्‍न उपस्थित करावा लागतो, हे हिंदूंना लज्जास्पद !