सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातील एका सूत्राविषयी श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७७ वर्षे) यांचे झालेले चिंतन

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या एका सूत्राच्या अनुषंगाने गुरुकृपेने माझे झालेले चिंतन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.

सद्गुरु स्वाती खाडये

१.  सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘समोर आलेली व्यक्ती, घडणारी प्रत्येक घटना, प्रसंग आणि परिस्थिती एक आरसा आहे’, असा भाव ठेवण्यास सांगणे 

‘सद्गुरु स्वातीताईंनी (सद्गुरु स्वाती खाडये यांनी) एका सत्संगात साधनेविषयी मार्गदर्शन करतांना सांगितले, ‘‘आपल्यासमोर आलेली प्रत्येक व्यक्ती, घडणारी प्रत्येक घटना, प्रसंग आणि परिस्थिती आपल्यासाठी एक आरसा आहे’, असा भाव ठेवायचा. आपण समोरच्या व्यक्तीशी जसे बोलतो, वागतो आणि तिच्याप्रती जसा भाव ठेवतो, तेच ‘बिंब-प्रतिबिंब’ या न्यायाने त्या व्यक्तीकडून आपल्याकडे परत येत असते. आपल्यासमोर असलेल्या त्या आरशामध्ये (व्यक्ती, प्रसंग, घटना इत्यादींमध्ये) आपल्याला देव पहायला शिकायचे आहे. प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंग यांमध्ये आपण ‘देवाला पहात आहोत’, असा भाव ठेवल्यास आपल्याला सगळीकडे देव दिसू लागेल आणि त्यांतून आपल्याला आनंद घेता येईल. त्यामुळे प्रसंग आणि परिस्थिती कशीही असली, तरी आपल्याकडून स्थिर राहून सावधपणे आणि सतर्कतेने वागण्याचे प्रयत्न देवच करून घेणार आहे. ‘आपल्याला कुणी पहात नाही’, असे वाटले, तरी ‘देव पहात आहे’, याची जाणीव होऊन आपण देवाला अपेक्षित असेच बोलण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करूया.’’

२. ‘ऐकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती अल्प असणे’, या अहंच्या पैलूवर चिंतन करणे

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

सद्गुरु स्वातीताईंच्या मार्गदर्शनानुसार मी भाव ठेवण्याचा प्रयत्न केल्यावर ‘समोरच्या व्यक्तीमध्ये देव पहाण्यात प्रामुख्याने माझी ‘स्वीकारण्याची वृत्ती’ अल्प पडते’, हे मला जाणवले. मी चिंतन केल्यावर ‘स्वीकारण्याची वृत्ती’ अंगीकारल्यास पुढीलप्रमाणे लाभ होत असल्याचे माझ्या लक्षात आले.

अ. आपल्यात प्रेमभाव, नम्रता आणि समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न वाढतो.

आ. अंतर्मुखता वाढून इतरांचे गुण लक्षात येतात.

इ. सकारात्मक रहाता येते.

ई. पूर्वग्रहाचे प्रमाण उणावून वर्तमानकाळात रहाता येते.

उ. प्रसंगातील ताण न्यून होण्यास साहाय्य होते.

ऊ. कर्तेपणा न्यून होण्यास साहाय्य होते.

ए. प्रतिक्रिया उणावतात.

ऐ. रागाचे प्रमाण न्यून होते.

ओ. तुलना करण्याचा भाग न्यून होतो.

औ. काही वेळा आपले बरोबर असूनही समोरच्याचे ऐकल्याने आणि स्वीकारल्याने न्यूनपणा घेणे जमू लागते.

क. परेच्छेने वागण्यास आरंभ होऊन नंतर आपली ईश्वरेच्छेच्या दिशेने वाटचाल होते.

३. ‘देव सर्व पहात आहे’, हा भाव ठेवल्यास वर्तनात पालट होणे

‘स्वीकारण्याच्या वृत्तीचा अभाव’, हा अहंचा पैलू न्यून केल्यास आरसारूपी परिस्थिती घटना, प्रसंग, व्यक्ती, पशूपक्षी, प्राणीमात्र इत्यांदीमध्ये देव पहाता येईल. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनीही साधकांना ‘देवाचे चित्रीकरण चालू असून तो प्रत्येक गोष्ट पहात आहे’, असा भाव ठेवावयास सांगितला होता. त्यामुळे ‘देव सर्व पहात आहे’, याची जाणीव होऊन आपल्या वर्तनामध्ये पालट होऊ शकतो.

४. ‘परिस्थिती स्वीकारणे, हीच सर्वोत्तम साधना आहे’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सुवचनानुसार चिंतन होणे आणि साधनेचे अंतिम ध्येय लक्षात येणे

काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परिस्थितीचा स्वीकार करणे, हीच सर्वोत्तम साधना आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टरांचे एक सुवचन दिले होते. साधकाची ऐकण्याची आणि स्वीकारण्याची वृत्ती झाल्यास त्याला परेच्छेने वागण्यास जमून सर्वत्र देवाला पहाता येईल आणि त्याची ईश्वरेच्छेच्या दिशेने वाटचाल होईल.

स्वीकारण्याची वृत्ती अंगीकारल्यास सद्गुरु स्वातीताई आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या अनुक्रमे ‘आरसा’ आणि ‘देवाचे चित्रीकरण’ या माध्यमांतून आपल्यालाही सर्वत्र देवाच्या अस्तित्वाची अनुभूती घेणे शक्य आहे. ‘आपल्यातही तोच देव आहे. ‘देव आणि मी एकच आहे’, हे अनुभवणे, म्हणजेच ‘सोहम् तत्त्व’ आत्मसात् करणे असून हेच साधनेचे अंतिम ध्येय आहे’, असे माझ्या लक्षात आले.

‘परात्पर गुरुदेवांनी परेच्छेने वागण्यामध्ये अडसर असलेले दोष आणि अहं न्यून करून ईश्वरेच्छेच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्हा सर्व साधकांना बुद्धी, शक्ती आणि बळ द्यावे’, हीच परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– आपला चरणसेवक

श्री. दत्तात्रय कुलकर्णी (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ७७ वर्षे), गावभाग, जिल्हा सांगली. (२४.१०.२०२०)