गुरुपौर्णिमेमध्ये ‘धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेची आवश्यकता !’ या विषयावर केलेले मार्गदर्शन
गुरुपौर्णिमा हा श्री गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरु म्हणजे केवळ देहधारी व्यक्ती नव्हे, तर ते एक तत्त्व आहे. आपण सगळे जण या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित आहात, ही एकप्रकारे श्री गुरुतत्त्वाचीच आपल्यावर असलेली कृपा आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण या गुरुतत्त्वाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, हे जाणून घेऊया आणि त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करूया.
गुरु-शिष्य परंपरा हे भारताचे वैशिष्ट्य आहे. या गुरु-शिष्य परंपरेने केवळ आत्मोन्नतीचे व्यष्टी ध्येय साकार केले नाही, तर समष्टी स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांच्या संरक्षणाचे, तसेच जनसामान्यांमध्ये धर्म-अध्यात्म-भक्ती यांच्या प्रसाराचेही कार्य केले आहे. भगवान श्रीकृष्ण-अर्जुन, आर्य चाणक्य-चंद्रगुप्त, विद्यारण्यस्वामी-हरिहरराय, समर्थ रामदासस्वामी-छत्रपती शिवाजी महाराज अशी कितीतरी उदाहरणे देता येईल. आजचा काळ हा युगपरिवर्तनाचा अर्थात् धर्मसंस्थापनेचा काळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये समाजात धर्मी विरुद्ध निधर्मी, राष्ट्रभक्त विरुद्ध राष्ट्रविरोधी यांचे ध्रुवीकरण होत आहे. ध्रुवीकरणाच्या या काळात आपल्याला तटस्थ भूमिका घेऊन चालणार नाही, तर धर्माच्या बाजूने ठामपणे उभे ठाकले पाहिजे. त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ‘धर्म म्हणजे काय ?’, हे समजून घ्यावे लागेल.
१. धर्म म्हणजे काय ?
धर्म म्हणजे पंथ नव्हे, तर सनातन हिंदु वैदिक धर्म हाच एकमेव धर्म आहे. धर्म म्हणजे केवळ पूजाअर्चा किंवा पोथीवाचन नव्हे, तर व्यक्तीच्या आचार-विचारासह जीवनातील प्रत्येक अंगाशी धर्म जोडला आहे. ‘समाजव्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, या गोष्टी ज्याच्यामुळे साध्य होतात, तो धर्म’, अशी आद्यशंकराचार्यांनी धर्माची व्याख्या केली आहे. धर्मशास्त्रकारांच्या मताप्रमाणे ‘धर्म’ या शब्दात प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा, तसेच समाजाचा विकास करण्यासाठी करायच्या कृत्यांचा आणि पाळायच्या निर्बंधांचा समावेश होतो. धर्म शब्दाचा अर्थ ‘वर्णाश्रमानुसार व्यक्तीकडे आलेले किंवा व्यक्तीने अंगीकारलेले कर्तव्य’ असाही आहे. एखादा गृहस्थाश्रमी पुरुष असेल, तर आई-वडिलांची सेवा हा त्याचा ‘पुत्रधर्म’ आहे. पत्नीचे संरक्षण हा ‘पतीधर्म’, तर मुलांचे संगोपन आणि त्यांच्यावर सुसंस्कार करणे, हा ‘पिताधर्म’ होय.
२. धर्माचा विलोप
आज मात्र सर्वत्र धर्म लोप पावत असल्याचे दिसून येते. पतीकडून पत्नीवर अत्याचार होत आहेत, पती किंवा पत्नी विवाहबाह्य संबंध ठेवत आहेत, आई-वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला जात आहे, अशा स्वरूपाच्या घटना समाजात नित्याच्याच झाल्या आहेत. याचे कारण कुटुंबातील सदस्य त्यांच्या कर्तव्याचे पालन करण्यात किंवा दायित्व निभावण्यास कमी पडत आहेत. धर्म जसा व्यक्तीगत-कौटुंबिक जीवनात लोप पावत चालला आहे, तसाच तो सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनातही लोप पावतांना दिसून येत आहे. प्रजेचे पालनपोषण आणि संरक्षण करणे, हा राजाचा अर्थात राज्यकर्त्याचा धर्म आहे. त्यालाच राजधर्म म्हणतात; पण आजच्या लोकशाही व्यवस्थेत जनतेत धर्माला स्थानच नसल्याने प्रजेला सुख-समृद्धी आणि सुरक्षितता अनुभवता येत नाही.
समाजाच्या विविध घटकांकडूनही कर्तव्यरूपी धर्म लोप पावत चालल्याने आपल्याला मनस्ताप वाट्याला येतो. उदाहरणार्थ, प्रतिदिन आपल्याला मिळणार्या दुधामध्ये भेसळ असते, ‘रेशन’मध्ये निकृष्ट दर्जाचे धान्य मिळते, पेट्रोल भरतांना मापात मारले जाते, सरकारी कामे करण्यासाठी कित्येक पट वेळ द्यावा लागतो, पोलिसांकडून तक्रारीची नोंद घेतली जात नाही, असे प्रत्येकच क्षेत्रात आपल्याला अनुभव येतात. त्यामुळे याला ‘लोकशाही’ म्हणावे, असे काहीच घडतांना दिसत नाही.
समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनते आणि अपप्रकार करण्यापासून परावृत्त होते. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
३. धर्मनिष्ठ समाजाची उदाहरणे
धर्मनिष्ठ समाजाची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. उदाहरण घ्यायचेच झाल्यास म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या काळात एका गडावर सापडलेला सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा गडावरील मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुपूर्द केला. राजा आणि प्रजा दोघेही नीतीमान ! ‘यथा राजा तथा प्रजा’ या न्यायाने पूर्वीचे राजे धर्मनिष्ठ असल्याने प्रजाही धर्मनिष्ठ अर्थात् नीतीमान होती. अशी सहस्रो उदाहरणे आपल्याला आपल्या इतिहासात मिळतील.
४. धर्माचा विलोप होण्याची कारणे, परिणाम आणि उपाययोजना
अगदी काही शे-दीडशे वर्षापूर्वीपर्यंत समाज धर्मनिष्ठ आणि पापभिरू होता. पाप-पुण्य या संकल्पना मानल्या जायच्या. चुकीच्या गोष्टी केल्या, तर पाप लागते आणि पुण्य अर्थात् शुभकर्म केले की मृत्यूनंतर सद्गती मिळते, अशी समाजात श्रद्धा होती. त्यामुळे अपराधांचे प्रमाणही अल्प होते. आज मात्र पाप-पुण्य या संकल्पनेला थोतांड समजले जाते. धर्म म्हणजे काय, धर्म काय सांगतो, याचे ना शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण मिळते, ना मंदिरांमधून, ना आपल्या घरांतून ! शाळांमधून नीतीमान होण्यासाठी काय करावे, चांगला नागरिक होण्यासाठी काय करावे, धर्म काय सांगतो, हे शिकवले जात नाही. याचाच परिणाम म्हणून आज देश आणि धर्म यांची दुःस्थिती झाली आहे. सर्वत्र रज-तमप्रधान वातावरण निर्माण झाले आहे.
५. हिंदु राष्ट्राची आवश्यकता
धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती करायची असेल, तर त्यासाठी पूरक असे वातावरण निर्माण करायला हवे. यासाठी समाजामध्ये धर्माचरण, उपासना, नीतीमानता आदी गोष्टींचा प्रसार करून समाजाकडून तसे प्रयत्न करवून घेतले पाहिजेत. यासाठी राज्यव्यवस्थाही धर्माधिष्ठित असायला हवी. पूर्वीच्या काळी राजा धर्मगुरूंच्या मार्गदर्शनानुसार राज्यकारभार करत असे. राजा अधर्माने वागला, तर राजालाही दंडीत केले जात असे. आज भारताच्या ‘सेक्युलर’ (निधर्मी) व्यवस्थेत मात्र सनातन धर्माला प्रतिष्ठा आणि राजाश्रय नाही.
धर्माच्या अधिष्ठानासाठी मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. पूर्वी मंदिरासाठी राजे-महाराजे दान करत असत; आज मात्र मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांचा देवनिधी लुटला जात आहे. मंदिरांच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. पूर्वी धर्मस्थळे ही राज्यव्यवस्थेकडून संरक्षित केली जात होती, आज मात्र आपल्या एकेका धर्मस्थळांच्या मुक्ततेसाठी प्रदीर्घ संघर्ष करावा लागत आहे. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अयोध्येत राममंदिराची निर्मिती होत आहे. आज काशी-विश्वेश्वराच्या मुक्तीसाठी लढा चालू आहे, तर श्रीकृष्ण जन्मभूमी, तेजोमहालय अर्थात ताजमहल, विष्णुस्तंभ अर्थात् कुतूबमिनार आदी हिंदूंची शेकडो धर्मस्थळे इस्लामी अतिक्रमणांतून मुक्त होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
आज अनेक मंदिरे ‘सेक्युलर’ सरकारच्या नियंत्रणात आहेत. तेथील पूजापाठ, धार्मिक परंपरा यांमध्ये सरकार हस्तक्षेप करत आहे. जर हिंदूंची धर्मस्थळे मुक्त नसतील, ती धर्मशिक्षणाची केंद्रे नसतील, तर धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती कशी होणार ? यासाठी सेक्युलर नव्हे, तर ‘हिंदु राष्ट्रा’ची आवश्यकता आहे.
स्वामी वरदानंदभारती यांनी म्हटले होते, ‘धर्म असेल, तरच ते राष्ट्र सुखी, शांत असते. संघर्षरहित, शांत आणि समाधानी जीवनासाठी धर्म आवश्यक आहे. लोक म्हणतात, धर्म मोडल्यावर काय होते ? आरोग्याचे नियम मोडल्यावर जे शरिराचे होते; ते धर्म मोडल्यावर समाजाचे होते. आरोग्याचे नियम मोडल्यावर शरिरात रोग निर्माण होतात. धर्म मोडल्यावर समाजात भ्रष्टाचार, अनीती, गुन्हे इत्यादी रोग निर्माण होतात.’ हे किती तंतोतंत खरे आहे, हे आज आपण अनुभवत आहोत.
सध्याच्या निधर्मी व्यवस्थेत भ्रष्टाचाराने उच्चांक गाठला आहे. आपल्याला वर्तमानपत्राचे पान उघडले की, हत्या, बलात्कार, जाळपोळ, दंगल, भ्रष्टाचार यांच्याच बातम्या वाचायला मिळतात. आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. गंभीर गुन्हे प्रविष्ट असणार्या खासदारांचे प्रमाण अवघ्या १० वर्षांत १०९ टक्क्यांनी वाढले आहे. जर देशाचे कायदे बनवणारेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील, तर त्यांच्याकडून न्यायाच्या राज्याची अपेक्षा करता येईल का ? खरेतर राजधर्म काय आहे, प्रजेची कर्तव्ये कोणती आहेत, शासनव्यवस्था कशी असावी, प्रशासन कसे असावे, न्यायप्रणाली कशी असावी, याचे तपशीलवार वर्णन आपल्या धर्मग्रंथांमध्ये केले आहे; मात्र त्याविषयी अज्ञान, तसेच अनास्था असल्याने त्यानुसार राज्यकारभार केला जात नाही. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. निधर्मी व्यवस्थेत हा प्राणच निघून गेल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे राष्ट्राला खर्या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रामध्ये समाजाचे हित साधले जाईल.
५ अ. हिंदुविरोधी घटना : आज हिंदुविरोधी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे.
५ अ १. हिंदूबहुल भारतात ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘थूंक जिहाद’ची षड्यंत्रे चालू आहेत. ‘गड जिहाद’च्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार असणार्या गड-दुर्गांवर अवैध दर्गे, मशिदी उभारण्यात येत आहेत.
५ अ २. हिंदुत्वनिष्ठांच्या हत्यांचे सत्र थांबलेले नाही. काही महिन्यांपूर्वी कमलेश तिवारी, हर्ष, श्रीनिवासन् आदी हिंदु नेत्यांच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या.
नुकतेच राजस्थानमधील उदयपूरमध्ये नुपूर शर्माचे समर्थन करणारी पोस्ट (लिखाण) प्रसारित केल्याने कन्हैयालाल या हिंदू टेलरची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्याच दिवशी महाराष्ट्रातील अमरावतीमध्येही याच कारणामुळे उमेश कोल्हे या मेडिकल चालक हिंदूची हत्या करण्यात आली, पण ही बातमी दाबण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे ती सर्वदूर पोहोचली नाही. या होत असलेल्या घटनांमधून हिंदु समाजाने बोध घ्यायला हवा. या केवळ घटना नसून पद्धतशीरपणे राबवण्यात येत असलेले षड्यंत्र आहे.
५ अ ३. आज धर्मांतरणाचे कार्यही मोठ्या प्रमाणात चालू आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये ‘लावण्या’ नावाच्या एका गरीब विद्यार्थिनीला धर्मांतराच्या दबावामुळे आत्महत्या करावी लागली.
५ अ ४. या वर्षी श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने काढल्या गेलेल्या शोभायात्रांवर पूर्वनियोजित आक्रमणे करून दंगली घडवण्यात आल्या.
५ अ ५. नुकतेच ‘जमीयत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना महमूद मदनी यांनी ‘समान नागरी कायद्याच्या आधारे शरीयतमध्ये हस्तक्षेप चालणार नाही. हिंदूंना मुसलमान आवडत नसतील, तर हिंदूंनी भारत सोडून निघून जावे’, असे उघडपणे धमकावले होते. मुसलमानांनी धमकावून काश्मीरमधून हिंदूंना बाहेर काढले, आता उर्वरित भारतातून बाहेर काढण्याची त्यांची ही धमकी आहे.
अशा स्थितीत हिंदु समाजाच्या रक्षणासाठी ‘हिंदु राष्ट्रा’चीच आवश्यकता आहे.
६. नियमित धर्माचरण आणि साधना करा !
हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असेल, तर आधी आपल्या आचारणात हिंदु राष्ट्र यायला हवे, तरच आपण ते प्रत्यक्षात आणू शकू. आज आपल्या आचार-विचारांचेही पाश्चात्यीकरण झाले आहे. आपला आहार-विहार, पोशाख, संभाषण यांवर अभारतीय संस्कारांचा पगडा निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ, आपल्या भारतीय संस्कृतीत मंगलप्रसंगी दिवा विझवण्याची संस्कृती नाही, तर दिवा प्रज्वलित करण्याची शिकवण आहे; पण आपण वाढदिवस पाश्चात्त्यांप्रमाणे मेणबत्त्या विझवून साजरा करतो. मंदिरासमोरून जातांना हात जोडायला लाजतो, इतकंच काय तर जेवण करण्यापूर्वी हात जोडून प्रार्थना करण्यास आणि श्लोक म्हणण्यास लाजतो. अशा नित्य धर्माचरणाच्या कृतींतून मिळणारे चैतन्य आणि तेज यांपासून आपण वंचित झालो आहोत. पूर्वीच्या काळी समाज धर्माचरणी होता, त्यामुळे तो तेजस्वी होता.
‘सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजा-अर्चा, सण आणि उत्सव हे शास्त्र समजून घेऊन करणे, तसेच कुलाचार अन् कुलपरंपरा सांभाळणे, यालाच ‘धर्माचरण’ असे म्हणतात. हिंदु संस्कृतीतील विविध उपासनामार्ग, सण-उत्सव, आचारविचार, आहारविहाराच्या पद्धती यांतूनच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीतूनच सत्त्वगुण वाढेल, म्हणजे साधना होईल, अशी योजना हिंदु धर्मात आहे. हे हिंदु धर्मसंस्कृतीचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. आपण आजच्या काळात धर्माचरणासाठी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.
६ अ. गोल टोप्या घालून फिरणारे लाज बाळगत नाहीत; मात्र माथ्यावर टिळा लावण्यास आपल्याला लाज वाटते. विवाहित स्त्रियाही कुंकू लावत नाहीत. धर्माचरण म्हणून प्रतिदिन महिलांनी कुंकू आणि पुरुषांनी टिळा लावून घराबाहेर पडायला हवे.
६ आ. दिवसातून ५ वेळा भूमीवर डोके ठेवून नमाज पढणार्या मुसलमानांकडून आपण धर्मप्रेम शिकले पाहिजे. आपण दिवसातून किमान ५ वेळा तरी ‘हे श्रीकृष्णा, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण कर ! लवकरात लवकर भारतात ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना कर !’, अशी प्रार्थना करायला हवी. यांसारख्या अनेक कृती आपण नियमित करत गेलो, तर समाजावरील पाश्चात्त्यीकरणाचा प्रभाव कमी होईल आणि समाज धर्माचरणाकडे वळेल.
७. हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माचरण आणि साधना आवश्यक !
धर्माचरण आणि साधना यांमुळे काय होते, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे चरित्र निर्माण होते. राजमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण, महाभारत या धर्मग्रंथांतील कथा सांगून त्यांच्यावर धर्माचे संस्कार केले, गोरक्षणाचे संस्कार केले, महिलांच्या रक्षणाचे संस्कार केले, तसेच कुलोपासना आणि साधना यांचे संस्कार केले. त्यामुळे महाराज तुळजाभवानीचा सतत नामजप करायचे. त्यांनी समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज या संतांच्या आज्ञेने राज्यकारभार केला. परिणामी राज्याभिषेक होऊनही संतांच्या आज्ञेने राज्य करणारा, शौर्याने धर्माचे रक्षण करणारा आणि मानव असूनही अवतारांप्रमाणे धर्मसंस्थापना करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडला !
धनुर्धारी अर्जुनही भगवान श्रीकृष्णाचा परमभक्त होता. याचा प्रत्येक बाण लक्ष्यवेध करायचा; अर्जुन सतत ‘श्रीकृष्ण, श्रीकृष्ण’, असा नामजप करायचा. अर्जुनाने श्रीकृष्णभक्तीच्या सामर्थ्यावर पांडवांना महाभारताचे युद्ध जिंकवून दिले. आपल्यालाही असे धर्माचरण आणि ईश्वराची भक्ती करून धर्मसंस्कृतीचे रक्षण करायचे आहे. असे करणे हे काळानुसार धर्मपालनच आहे.
साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न. साधनेने व्यक्तीला तणावरहित आणि आनंदी जीवन जगता येते. साधनेमुळे मनुष्य सदाचारी आणि धर्मनिष्ठ होतो. धर्मनिष्ठा असलेली व्यक्ती हिंदु धर्माची हानी स्वतः करत नाही आणि दुसर्यांनी केलेली धर्महानी तिला सहन होत नाही; म्हणून धर्मरक्षणाचे खरे कार्य साधना करणारी व्यक्तीच करू शकते. साधनेने आत्मबल जागृत होते, तसेच या कार्याला ईश्वराचा आशीर्वादही लाभतो.
भगवंताचे अधिष्ठान हे भगवंताच्या नामस्मरणाने निर्माण होते. यासाठी नामसाधना करणे आवश्यक आहे. आपल्याला हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्याने आपण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी साधना करून आणि ईश्वरी अधिष्ठान ठेवून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करायला हवे, तरच आपल्याला यश मिळणार आहे.
आज समाजातील प्रत्येक व्यक्ती धर्माचरण करू लागली, उपासना करू लागली, तर ती व्यक्ती धर्मनिष्ठ होईल. अशा धर्मनिष्ठ व्यक्तींच्या समूहातूनच धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती होऊ शकेल. संतांनी सांगितले आहे की, कलियुगात ‘नामजप’ ही काळानुसार सर्वाेत्तम साधना आहे. या दृष्टीने साधनेच्या आरंभीच्या टप्प्याला आपण कुलदेवीचे नामस्मरण करायला हवे. तिच्या नामस्मरणातून आपली प्रगती झाली की, गुरु आपल्या जीवनात येतात. त्यानंतर श्रीगुरु सांगतील, तो नामजप आपण करायला हवा. कुलदेवता श्री भवानीदेवी असेल, तर ‘श्री भवानीदेव्यै नमः।’ असा नामजप करावा. जर कुलदेवी माहित नसेल, तर ‘श्री कुलदेवतायै नमः।’ असा नामजप केला, तरी तो कुलदेवीपर्यंत पोचतो. कुलदेवी ठाऊक नाही, तर कुलदेवाचा नामजप करावा. कुलदेव श्री खंडोबा असेल, तर ‘श्री खंडोबा देवाय नमः।’ असा नामजप करावा. तुम्ही जर आधीपासून कोणत्या उपास्यदेवतेचा किंवा संतांनी सांगितलेला जप करत असाल किंवा तुम्हाला एखाद्या जपामुळे अनुभूती आल्या असतील, तर तोच जप चालू ठेवावा.
‘यतो धर्मस्ततो जयः ।’, म्हणजे ‘जेथे धर्म असतो, तेथे विजय असतो’, हे धर्मवचन आपल्याला सार्थ करायचे आहे. केवळ हिंदु धर्मसंस्कृतीचे रक्षण करणे, एवढे संकुचित ध्येय आपले नाही. ‘कृण्वन्तो विश्वम् आर्यम् ।’, म्हणजे ‘अखिल विश्व सुसंस्कृत करू’, अशी आपल्या पूर्वजांची घोषणा होती. ती सार्थ करण्याचे धर्मकर्तव्यही आपल्याला पार पाडायचे आहे.
८. सर्वस्वाचे योगदान देण्याचा निश्चय करा !
भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्रच आहे; मात्र वर्ष १९७६ मध्ये आणीबाणीच्या काळात विरोधी पक्ष कारागृहात असतांना काँग्रेसने घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घटनेच्या प्रस्तावनेत घुसडण्यात आला. आता पुन्हा एकदा घटनादुरुस्ती करून भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित केले जावे, अशी आपण संघटितपणे मागणी करायला हवी. ही मागणी पूर्णतः घटनात्मक आहे. अशी मागणी करणे काहीच चुकीचे नाही. हिंदु राष्ट्राची मागणी ही गुरुपरंपरेला अपेक्षित असलेल्या धर्मसंस्थापनेच्या कार्याचाच भाग आहे.
संतांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२५ मध्ये कालमहिम्यानुसार भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; पण या कार्यात आपण सहभागी झालो, तर श्रीगुरूंची कृपा आपल्यावर होणार आहे. जसे भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलल्यावर गोप-गोपींनी त्या पर्वताला त्यांच्या क्षमतेनुसार काठ्या लावल्या होत्या. त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचे आहे. कालमहिम्यानुसार सध्या आपत्काळाला आरंभ झाला आहे. सहस्रो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या जीवनाडीपट्ट्यांमध्ये आगामी काळात ‘कोरोनापेक्षाही महाभयंकर महामारी येईल, नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून शेकडो लोक मृत्युमुखी पडतील, तसेच महाभयंकर तिसरे विश्वयुद्ध होऊन विनाश होईल’, असे म्हटले आहे. आज रशिया-युक्रेन युद्धाच्या निमित्ताने जग २ गटांत विभागले गेले आहे. चीन-तैवान यांच्यामध्येही संघर्ष चालू आहे. आजची जागतिक स्थिती इतकी अस्थिर आहे की, तिसर्या महायुद्धाचा कधी भडका उडेल, ते सांगता येणार नाही. हा आपत्काळ सरल्यानंतर हिंदु राष्ट्राची सोनेरी पहाट उगवणारच आहे; पण या आपत्काळातून तरून जायचे असेल, तर आपल्याकडे साधनेचे अर्थात् धर्माचे बळ असणे आवश्यक आहे. तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी स्वतःचे तन, मन, धन, बुद्धी आणि कौशल्य यांचे योगदान देण्याचा निश्चय करूया. काळानुसार हीच आपली गुरुदक्षिणा आहे.
– (सद्गुरु) श्री. नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था.