औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण !

नव्या शासनाच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – ‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याविषयीच्या प्रस्तावास, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला. १६ जुलै या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नामकरणाविषयीच्या प्रस्ताव संमतीचे २९ जून २०२२ या दिवशीच्या तत्कालीन सरकारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर ‘हे प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत’, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव फेरसादर करण्यात आल्यानंतर प्रस्तावांना मंत्रीमंडळाने मान्यता दिली.

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असतांना मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला निर्णय अवैध असल्याने १६ जुलै या दिवशीच्या बैठकीत हे प्रस्ताव संमत करण्यात आले. आता हा नवीन प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवून त्यानंतर विभाग, जिल्हा, तालुका, महानगरपालिका आणि नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येणार आहे. याविषयीची कार्यवाही महसूल विभाग, वन विभाग, तसेच नगरविकास विभाग यांच्याकडून  अधिनियमांप्रमाणे स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.